बदलापूरः फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बदलापूर शहर पदपथ मोकळे करण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी धडक कारवाई केली होती. त्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सायंकाळनंतर शहराच्या प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांना मोकळे करण्यासाठी सोमवारी कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वर्दळीचे रस्ते मोकळे झाले. अनेक टपऱ्या, पदपथावरील दुकाने, हातगाड्या यावेळी हटवण्यात आल्या. नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत केले जाते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर शहरात गेल्या काही महिन्यात महत्वाचे पदपथ, चौक, रस्ते आणि मोकळ्या जागा फेरिवाले, अतिक्रमणांनी गिळंकृत केले होते. पदपथही व्यापले गेल्याने पादचाऱ्यांना रस्त्याने चालावे लागत होते. परिणामी वाहतूक कोंडी आणि अनेक समस्या उद्भवत होत्या. त्यामुळे पदपथ आणि रस्ते मोकळे करावे, चौकातील अतिक्रमणे हटवावी अशी मागणी होत होती. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास चार दिवस कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी केलेल्या या धडक कारवाईचे शहरातून कौतुक झाले. चार दिवस चाललेल्या या कारवाईत शहरातील महत्वाचे वर्दळीचे भाग, चौक यांच्यासह अंतर्गत रस्ते आणि पदपथ मोकळे झाले होते. त्यामुळे पदपथांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र दिवसा कारवाई होते आणि खरी गर्दी, कोंडी सायंकाळी होते त्यामुळे त्यावेळीही कारवाई करावी अशी मागणी जोर धरत होते. मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी सायंकाळनंतरही कारवाई केली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी सायंकाळनंतर शहराच्या पश्चिम भागातील बाजारपेठ, खाऊ गल्ली परिसरात धडक कारवाई करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी गायकवाड स्वतः हजर होते. यावेळी अनेक दुकाने, हातगाड्या आणि टपऱ्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. पूर्वेतील प्रस्तावित पनवेल मार्गावरही कारवाई करण्यात आल्याची माहिती मारूती गायकवाड यांनी दिली आहे.

सायंकाळी कारवाई केल्याने अचानक फेरिवाल्यांची तारांबळ उडाली. अनेकांनी आपले साहित्य हटवले. मात्र अनेक साहित्य कारवाईत आले. या कारवाईमुळे सायंकाळनंतर बाजारपेठ परिसर मोकळा वाटत होता. ही कारवाई यापुढेही सुरूच राहील अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

भाजी मंडईत गर्दी

रस्त्यावर, पदपथावर बसणारे विक्रेते, अनधिकृत फेरिवाले आणि हातगाड्या कारवाईमुळे सोमवारी सायंकाळी स्थानक परिसरातून पळाले. त्यामुळे नागरिकांनी स्थानक परिसरात असलेल्या अधिकृत भाजी मंडईत गर्दी केली होती. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. तर नागरिकही या कारवाईचे स्वागत करताना दिसत होते.