‘आशिकी २’ंमधील ‘चाहूं मै या ना..’ असो की ‘ये जवानी.’मधील कबिरा असो की ‘हम्प्टी शर्मा..’मधील ‘समझांवाँ’ असो बॉलीवूडमधील सध्याचा आघाडीचा गायक अर्जित सिंगने आपल्या आवाजाने तरुणाईला बेधुंद केले आहे. आज घडीला बॉलीवूडच्या बहुतांश सुपरहिट गाण्यांना आपल्या स्वरांनी सजवणाऱ्या अर्जित सिंगला थेट पाहण्याची, ऐकण्याची संधी चालून आली आहे. नवी मुंबईच्या नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये अर्जित सिंगच्या ‘लाइव्ह कॉन्सर्ट’चे आयोजन करण्यात आले असून त्याच्या आवाजावर संगीताचा साज चढवण्यासाठी ‘ग्रँड सिम्फनी ऑर्केस्ट्रा’ची साथ लाभणार आहे. मात्र, हा कार्यक्रम सशुल्क आहे.
*कधी : सायंकाळी ५ वाजल्यापासून
*कुठे : डी. वाय. पाटील स्टेडिअम, सायन-पनवेल एक्स्प्रेस हायवे, नेरूळ, मुंबई.
गोपीकृष्ण महोत्सवाची रंगत
ठाण्यातील रसिक प्रेक्षकांचे गेल्या २२ वर्षांपासून मन जिंकणारा पद्मश्री नटराज गोपीकृष्ण संगीत महोत्सव आजपासून सुरू होत आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही दिग्गज मंडळींच्या कलाकृतीमुळे या महोत्सवाला रंगत प्राप्त होणार आहे. यंदाच्या वर्षी महोत्सवात राहूल शर्मा (संतुर), वैभव आरेकर (भरतनाटय़म), सुचित्रा हरमळकर (कथ्थक), वृषाली दाबके (कथ्थक), पं. रोणू मजुमदार (बासरी), पं. देबज्योती बोस (सरोद), पं. मुकुंदराज देव (तबला) आदी दिग्गजांची जुगलबंदी अनुभवता येणार आहे. अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा, याकरिता ठाण्यातील ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना व नृत्यगुरू मंजिरी देव यांच्या श्री गणेश कल्चरल अकादमीतर्फे गेल्या २२ वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
*कधी : शुक्रवार १८ डिसेंबर, वेळ : रात्री ८.३० वाजता
*शनिवार १९ डिसेंबर, वेळ : दुपारी ४.३० वाजता
*कुठे : गडकरी रंगायतन
वंचितांच्या रंगमंचावर ‘नाटय़जल्लोष’
ठाण्यातील गरीब वस्त्यांमध्ये आपले दैनंदिन आयुष्य जगणाऱ्या मुलांचे वास्तवदर्शी दृश्य नाटकांद्वारे शहरवासीयांसमोर येणार आहे. ज्येष्ठ नाटय़निर्माते रत्नाकर मतकरी यांच्या ‘वंचितांचा रंगमंच’ या उपक्रमांतर्गत ठाण्यातील टाऊन हॉल येथे ‘नाटय़जल्लोष २०१५’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात माजीवाडा, चिरागनगर, गोकुळनगर, लोकमान्यनगर, पानखंडा पाडा (ओवळा), येऊर, कोपरी, घणसोली, कळवा, कल्याण अशा विविध परिसरांतील गरीब वस्त्यांचे वास्तवदर्शी दृश्य दाखविणारी एकूण २० नाटके असणार आहेत. किशोरवयीन मुलांचा या नाटकांमध्ये समावेश असणार आहे. वीस नाटकांमधून निवडलेल्या सहा नाटकांचे ठाणे महानगपालिका आयोजित ‘बालनाटय़ महोत्सव २०१५’मध्ये सादरीकरण होणार आहे.
*कधी : शुक्रवार १८ डिसेंबर, वेळ : दुपारी ४ वाजता
*कुठे : अॅम्पी थिएटर, टाऊन हॉल, कोर्ट नाका, ठाणे (प.)
कुंभमेळा छायाचित्रकाराच्या नजरेतून..
कुंभमेळ्याचे विविध पैलू, छटा आपण आत्तापर्यंत नेहमीच पाहत आलो आहोत. याच धर्तीवर नुकतेच नाशिक येथे पार पडलेला सिंहस्थ कुंभमेळा एका ठाणेकर छायाचित्रकाराच्या नजरेतून अनुभवायची संधी ठाणेकरांसमोर चालून आली आहे. ठाण्यातील फोटो सर्कल सोसायटीच्या वतीने या विकेण्डला ठाणे कलाभवन येथे आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजनंदिनी यांच्या ‘माझा पहिला कुंभमेळा २०१५’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजनंदिनी यांनी नाशिक कुंभमेळ्यात टिपलेल्या विविध छायाचित्रांचे सादरीकरण या वेळी स्लाईड-शोच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. छायाचित्रांबरोबरच कुंभमेळ्यात आलेल्या अनुभवांचे कथन या वेळी राजनंदिनी करणार आहेत. फोटोसर्कल सोसायटीच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी स्लाईड-शो स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
*कधी : रविवार २० डिसेंबर, वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
*कुठे : ठाणे कलाभवन, बिग बझारजवळ, कापूरबावडी
डॉ. आंबेडकर यांच्या साहित्यावर चर्चा
बदलापुरात चांगल्या वाचकांची चळवळ जपण्यासाठी निर्माण झालेल्या अक्षरसंध्या वाचक कट्टय़ावर या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावर चर्चा करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यात असणाऱ्या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाचे निमित्त साधून ही चर्चा करण्यात येणार आहे. दरमहा होणाऱ्या या कार्यक्रमाचा हेतू हा समृद्ध वाचकांना एकत्र आणण्याचा असून लेखकांच्या साहित्यावर वाचकांकडून चर्चा करण्यात येते. कार्यक्रमाचे संयोजन वृत्तनिवेदक श्रीराम केळकर करणार असून शहरातील सर्व ग्रंथप्रेमी वाचकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
*कधी : रविवार , वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
*कुठे : काका गोळे फाऊंडेशन, अखिल इमारत, तलाठी ऑफिसजवळ, बदलापूर (पू.)
नाताळसाठी ब्रेड बेकिंग कार्यशाळा
डिसेंबर महिना आला की, सर्वाना नाताळ सणाचे वेध लागतात. नाताळ सणामध्ये पावाच्या पदार्थाचा आस्वाद घेण्याकडे बहुतेक खवय्यांचा आणि गृहिणींचा कल असतो. त्याच धर्तीवर ठाण्यातील कोरम मॉलतर्फे वुमन्स ऑन वेन्सडे उपक्रमांतर्गत खास महिलांसाठी ब्रेड बेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रमंडळींना नाताळामध्ये पावाचे विविध पदार्थ खाऊ घालायचे असतील, तर महिलांनी या कार्यशाळेमध्ये दाखल व्हायला हरकत नाही!
*कधी : बुधवार २३ डिसेंबर, वेळ : दुपारी ३ ते रात्री ८
*कुठे : कोरम मॉल, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ, ठाणे (प.)
होय! मी सावरकर बोलतोय..
प्रसिद्ध कादंबरीकार अनंत शंकर ओगले यांच्या पहिला हिंदूहृदयसम्राट या चरित्रावर आधारित ज्वलंत नाटय़ डोंबिवलीत सादर होत ओ. दादर आणि सोलापूर येथील प्रयोगाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर अभिजात नाटय़संस्था प्रस्तुत ‘होय! मी सावरकर बोलतोय’ हे सावरकरांच्या जीवनावर आधारित नाटय़ डोंबिवलीकरांच्या भेटीला येत आहे. नाटकामध्ये सचिन घोडेस्वार, प्रज्ञेश खेडकर, ओंकार पिंपळखरे, सुजाता देवधर, तेजस जेऊरकर, सुमित चौधरी आदी कलाकार असून सावरकरांच्या प्रमुख भूमिकेत आकाश भडसावळे आपली कला सादर करणार आहे.
*कधी : शनिवार १९ डिसेंबर, वेळ : दुपारी ४.३० वाजता
*कुठे : सावित्रीबाई फुले नाटय़गृह, डोंबिवली
‘द अनटोल्ड स्टोरी’ छायाचित्र प्रदर्शन
सायली घोटीकर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन ‘द अनटोल्ड स्टोरी’ सध्या सुरू आहे. जुन्या भिंतीवर ओघळणारे रंग, गंजलेली गाडी, गंजलेले धातूचे तुकडे, उभ्या-आडव्या रेघोटय़ा मारलेल्या भिंती अशा दुर्लक्षित गोष्टी या घोटीकर यांच्या छायाचित्रणाचा विषय बनल्या असून अशी छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
*जहांगीर कला दालन, काळा घोडा
*२२ डिसेंबपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७