tv16 ठाण्यात सध्या अशाच प्रकारचा चिंजाबी खाद्योत्सव सुरू आहे. ठाण्यातील लुईसवाडी येथील टेन्जो टेंपल या रेस्टॉरंटने चायनीज आणि पंजाबी पदार्थाचा मिलाप करून ‘चिंजाबी फूड फेस्टिव्हल’ आयोजित केले आहे. या खाद्यमहोत्सवामधील शाकाहारामध्ये तंदुर मंच्युरीयन, दम फ्राईड राईस बिर्यानी, तवा न्युडलस् तर मांसाहारामध्ये मटनसिग कबाब, चिकन हॉट बॅसिल टिक्का, चिकन दम फ्राईड राईस बिर्यानी, मलेशियन प्रॉन्स्, मटन रॉगन रोश, क्रॅबचिली अशा विविध पदार्थाची चव ठाणेकरांना चाखता येणार आहे. हा महोत्सव ६ ते १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

तणावमुक्तीसाठी नाचा!
tv14दैनंदिन जीवनात आपल्यापैकी प्रत्येकाला ताणतणावांना सामोरे जावे लागते. या तणावाला वयोमर्यादा नसते. नर्सरीमधल्या चिमुरडय़ांपासून ते दररोज गच्च भरलेल्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रौढांपर्यंत..प्रत्येकालाच तणाव असतो. तणावामुळे नैराश्य येते आणि हे नैराश्य वाढत गेले की त्याचा परिणाम वैयक्तिक आयुष्य, कुटुंब आणि कार्यालयीन कामकाजावरही होऊ शकतो. या तणावावर मात करण्यासाठी अभिनेते, नर्तक नकुल घाणेकर यांनी नृत्य शिबिराचे आयोजन केले आहे. त्यांच्या ‘डिफरंट स्ट्रोक्स’ या संस्थेच्या वतीने सोमवार ९ फेब्रुवारीपासून दोन आठवडय़ांसाठी दर सोमवारी, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ७ ते ८ आणि ८ ते ९ या वेळेत हे शिबीर होईल. त्यात प्रवेश विनामूल्य आहे. अर्थातच प्रवेश मर्यादित असून प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. स्थळ- तळमजला, वासुदेव सदन, दत्तमंदिरसमोर, कलानिधीपुढील गल्ली, नौपाडा, ठाणे (प) : ९६१९७०५२६२.

अमीन सयानींच्या साथीने पुन्हा ‘गीतमाला’
सिनेसंगीत शौकिनांनी आठवणींच्या कप्प्यात खोलवर जपून ठेवलेली रेडिओ सिलोनवरील ‘बिनाका गीतमाला’ पुन्हा एकदा दस्तुरखुद्द अमीन सयानींच्या साथीने ऐकण्याचा योग शनिवारी ठाण्यात जुळून आला आहे. मुलुंड येथील ‘लोट्स लीफ एन्टरटेन्टमेंट’ या संस्थेच्या वतीने रात्री साडेआठ वाजता ही मैफल रंगणार आहे. १९५२ ते १९९४ या काळात बिनाका गीतमालामध्ये अत्यंत गाजलेली निवडक गाणी सारेगामा विजेते गायक गौरव बांगला आणि अमृता नातू सादर करणार आहेत. संगीत संयोजन नरेंद्र सालासकर यांचे आहे. अमीन सायानी गाण्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.

‘पाऊले चालती’ प्रकाशन

ठाणे भारत सहकारी बँकेचे मा.य. गोखले लिखित ‘पाऊले चालती’ या व्यास क्रिएशन निर्मित पुस्तकाचे प्रकाशन रविवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सहयोग मंदिर सभागृह, पहिला मजला, घंटाळी, नौपाडा, ठाणे (प.) येथे होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. दाऊद दळवी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित राहणार आहेत.  

सालसा नृत्यधारा

युवा पिढीला नृत्याविषयी वाटणारी ओढ पाहता आता ठाण्यामध्ये विविध पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. पाश्चात्त्य देशातील कपडे, गाडय़ा, खाद्यपदार्थ आदींचा आपण कायमच आपल्या रोजच्या आयुष्यात वापर करत आसतो. मात्र आता ठाणेकरांच्या आठवडय़ाची रंगत वाढवण्यासाठी येथील उथळसर परिसरातील युनायटेड-२१ या तारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी ‘सालसा नाईट’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘सालसा’ हा लॅटीन अमेरिकन नृत्य प्रकार गेल्या काही वर्षांपासून भारतात चांगलाच लोकप्रिय होतो आहे. फिटनेस राखण्यासाठी या नृत्य प्रकाराचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जातो.

‘व्हॅलेंटाईन डे’ला कुछ मिठा हो जाये!
‘व्हॅलेंटाईन डे’ला आपल्या प्रियकराला काहीतरी खास भेट द्यावी, अशी इच्छा सर्वच प्रेयसींची असते. कुणी प्रेमसंदेश देणारी रंगबेरंगी ग्रिटिंग्ज देतात, तर कुणी छानसा शर्ट. यंदा मात्र प्रियकराला काही तरी द्यायचेच असेल तर गोडधोड द्या! कोरम मॉलने तशी सोयच केली आहे. व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रियकरांना आपल्या प्रेयसीच्या हातचे काहीतरी गोडधोड खाता यावे, यासाठी कोरम मॉलने महिलांसाठी ‘व्हॅलेंटाईन डे थीम डेझर्ट’ची कार्यशाळा आयोजित केली आहे. बुधवारी, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ८ यावेळेत कोरम मॉल,  कॅडबरी कंपाऊंडजवळ ठाणे(प.) येथे ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तर मग यंदाच्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला कुछ मिठा हो जाये!

बदलापूर महोत्सव २०१५
बदलापूरमध्ये उल्हास नदीकिनारी शिवसेनेच्या वतीने ‘बदलापूर महोत्सव २०१५’ आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. शुक्रवार ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात ‘भगवा’ हे नाटक, लावणी महोत्सव, कॉमेडी शो, मराठी सिनेतारकांचे नृत्याविष्कार असे विविधरंगी कार्यक्रम येथे होणार आहेत. ‘भगवा’ या नाटकासाठी सुप्रसिद्ध सिने अभिनेते अमोल कोल्हे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्रवेश विनामूल्य असला तरी प्रवेशिका घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महाराष्ट्र महोत्सव
झी टीव्हीवर दर सोमवार, मंगळवारी लागणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामार्फत रात्री ९.३० वाजता आपल्याला पोटभर हसवणारे हास्यकलावंत प्रत्यक्षात ठाणेकरांच्या भेटीला येणार आहेत. शिवसेना घोडबंदर विभाग आणि वैष्णवी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र महोत्सव’ कार्यक्रमात शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी ‘उत्सव नात्यांचा’ कार्यक्रमात भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके व हेमांगी कवी येणार आहेत, तर शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी महिलांसाठी खास ‘हळदी-कुंकू पैठणी जिंकू’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री तेजस्विनी लोणारी उपस्थित राहणार आहेत. रविवार ८ फेब्रुवारी रोजी ‘बॉलीवूड ऱ्हिदम’ ही संगीताची मैफल आयोजित करण्यात आली आहे. सारेगमप फेम विश्वजीत बोरवणकर व जुईली जोगळेकर यांच्या गायनशैलीमुळे कार्यक्रमास रंगत येणार आहे. ठामपा मैदान, स्वस्तिक रेसिडेन्सीसमोर, आनंदनगर, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे हा महोत्सव सुरू आहे.

ओळख परदेशी पाखरांची
वाढते शहरीकरण आणि धावपळीच्या वेळापत्रकात शहरी भागात पक्षी निरीक्षण आता दुर्लभच झाले आहे. वाढत्या प्रदूषणामुळेही शहरी भागातील पक्ष्यांचा राबता दुर्मीळ होऊ लागला आहे. शहराबाहेर मात्र अनेक ठिकाणी अजूनही पक्षी आढळून येतात. पुणे जिल्ह्य़ातील बारामती येथील उजनी धरणाजवळ असलेल्या भिगवन येथे सध्या युरोप आणि तिबेटहून अनेक पक्षी स्थलांतर करून आले आहेत. या परदेशी पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी पक्षीतज्ज्ञ मेधा कारखानीस यांनी भिगवन, बारामती येथे १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी पक्षी निरीक्षण आयोजित केले आहे. यामध्ये रोहीत पक्षी, चक्रवाक, चित्रबलाक, कुदळ्या, पट्टकादंब हंस असे पन्नास ते साठ विविध जातीचे पक्षी पाहायला मिळणार आहेत. संपर्क-९८२०१०१८६९.    

जोशी दाम्पत्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
ठाणे शहरातील विविध सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या अरविंद आणि रश्मी या जोशी दाम्पत्यांनी लिहिलेल्या दोन स्वतंत्र पुस्तकांचे प्रकाशन रविवार ८ फेब्रुवारी संध्याकाळी साडेचार वाजता सहयोग मंदिर, घंटाळी येथे होईल. रश्मी जोशी यांचे वृक्षपंचांग तर अरविंद जोशी यांचे ‘पुन्हा अमेरिका? नो इटस् न्यू इंग्लंड’ ही दोन्ही पुस्तके व्यास क्रिएशनच्या वतीने संपादित करण्यात आली आहेत.  

‘मन्ना’गीतांची सुरेल मैफल
tv15‘कसमे वादे प्यार,’ ‘वफा सब,’ ‘ये मेरे प्यारे वतन,’ ‘ये भाई जरा देख के चलो,’ ‘लागा चुनरी में दाग’ अशा सदाबहार गाण्यांमुळे संगीत रसिकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ पाश्र्वगायक मन्ना डे यांच्या गीतांची सुरेल मैफल रविवारी ब्रह्मांड कट्टा येथे आयोजित केली आहे. नितीन श्री आणि सहकारी गाणी सादर करणार आहेत. संकल्पना, लेखन आणि निवेदन राजेश शिंदे यांचे असून विजय पाटणकर यांनी संगीत संयोजन केले आहे. सांजस्नेह ज्येष्ठ नागरिक सभागृह, ब्रह्मांड पोलीस चौकीच्या मागे, आझादनगर, ठाणे (प.) येथे होणाऱ्या या मैफलीत रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
संकलन : शलाका सरफरे

Story img Loader