‘क्रिसिलिस’ महोत्सवात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे प्रतिपादन
ऋषिकेश मुळे, युवा वार्ताहर
‘तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करा व आपल्या मनात होणारी कोणत्याही प्रकारची घुसमट ही आपल्या कलेच्या माध्यमातून व्यक्त करून तिला एक वेगळे आकर्षित असे रूप द्या, असे प्रतिपादन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या क्रिसिलिस महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात व्यक्त केले. या वर्षीचा क्रिसिलिस महोत्सव हा ‘डिजिटलायझेशन’ या संकल्पनेवर आधारित असल्याने त्याला ‘क्रिसिलिस इम्बार्क’ असे नाव देण्यात आले होते. या महोत्सवात निरनिराळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
महाविद्यालयाच्या परिसरात ‘सोशल नेटवर्किंग’ची चित्रे व प्रतिकृती या लावण्यात आल्या होत्या. व्यवस्थापन विषयाशी संबंधित विविध स्पर्धाचेही या महोत्सवात आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेले दिग्दर्शक व लेखक नागराज मंजुळे यांचा व्यवस्थापन विभागाचे समन्वयक प्रा. मुर्डेश्वर यांच्या हस्ते नागराज मंजुळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी संज्ञापन व पत्रकारिता विभागाच्या प्रा. विमुक्ता राजे व प्रा. महेश पाटील यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची मुलाखत घेतली. राष्ट्रीय पारितोषिकप्राप्त झालेल्या ‘पिस्तुल्या’ या लघुपटापासून ते समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांचा वास्तवदर्शी चित्रण करणाऱ्या ‘फॅण्ड्री’सारख्या चित्रपटांपर्यंतचा प्रवास हा या मुलाखतीत उलगडला गेला. माणूस आणि जातीभेद यांचा असलेला समाजजीवनावरील पगडा व त्याचा समाजातील सूक्ष्म गोष्टींवर होणारा सार्वत्रिक परिणाम याचे विश्लेषणदेखील नागराज मंजुळे यांनी विद्यार्थ्यांसमोर केले. ‘सैराट’ या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनदेखील या वेळी करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा