संगीत मानपमान ते कटय़ार काळजात घुसली हा एक अनोखा स्वरमिलाप ‘सुरा मी वंदिलेच्या’ माध्यमातून सादर करीत नाटय़संगीताचा वारसा जपण्याचा प्रयत्न ठाण्यातील तरुण कलाकार करीत आहेत. ‘बालगंधर्व ते कटय़ार..’ एक सुरेल प्रवास त्याच धर्तीवर रसिकांच्या पसंतीला व विनंतीला मान देत पुन्हा एकदा ठाणेकर रसिकांना सूर तालाच्या बरसातीत चिंब भिजवून टाकण्यासाठी स्वरनिनाद व ऐस अॅण्ड फेस एंटरटेन्मेंट हा कार्यक्रम घेऊन आले आहेत. २ एप्रिल रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात रात्री ८.३० वाजता एक नवीन संकल्पना घेऊन तरुण कलाकार मंडळी येणार आहेत. पं. दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, पं. अभिषेकी व गानसम्राज्ञी किशोरीताई आमोणकर या दिग्गज कलाकारांना भरत बलवल्ली, आनंद भाटे व महेश काळे, आरती अंकलीकर, राहुल देशपांडे हे आपल्या संगीतातून मानवंदना देणार आहेत. पं. दीनानाथ मंगेशकर व पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या अजरामर झालेल्या तसेच काही दुर्मीळ बंदिशी व नाटय़पदे यांचा प्रथमच एक आविष्कार भरत बलवल्ली व महेश काळे घडविणार आहेत. त्यांना अमर ओक (बासरी), सत्यजित प्रभू ( सिंथेसायझर), आदित्य ओक (हार्मोनिअम) हे साथसंगत करतील.
कुठे- डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, हिरानंदानी मिडॉल्सजवळ, ठाणे (प.).
कधी- २ एप्रिल रोजी सायंकाळी ८.३० वाजता.
कलावंतांसोबत गप्पाटप्पा
गप्पांना कोणताही विषय वज्र्य नसतो. चार मित्रमैत्रिणी एकत्र आले की गप्पांचा फड निघतो आणि मग कुटुंबापासून देशापर्यंतच्या कोणत्याही विषयावर किती बोलू नि किती नको, असे होऊन जाते. आजकाल सोशल मीडियाचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की, थेट गप्पांवर काट मारत व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवरच ‘गप्पाष्टके’ सुरू असतात. पण एखाद्या निवांत ठिकाणी मंडळी जमवून केल्या जाणाऱ्या गप्पांची सर या ‘चॅटिंग’ला येत नाही. असाच अनुभव घ्यायचा असेल तर येत्या शनिवारी काशीनाथ घाणेकर नाटय़गृहाला जरूर भेट द्या. या ठिकाणी केदार फडके, अंबरीश देशपांडे आणि विक्रांत महल्ले, प्रतीक कानडे आणि आदित्य बर्वे हे कलावंत श्रोत्यांशी थेट संवाद साधणार आहेत. गाणी, कविता, नाटके, अजरामर साहित्यकृती अशा चौफेर विषयांवर ही मंडळी बोलणार आहेत. गेल्या वर्षी गप्पा-टप्पा नावाने त्यांनी हा कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. त्याची वर्षपूर्तीनिमित्त आयोजित या विशेष मैफलीत ठाणे शहराविषयी खास गाणी सादर केली जाणार आहेत. संपर्क आदित्य बर्वे- ९९२०४९९९४५ .
कधी- शनिवार, २ एप्रिल, वेळ : रात्री ८ ते १० .
कुठे- डॉ. काशीनाथ घाणेकर (मिनी) सभागृह, हिरानंदानी मेडोजजवळ, ठाणे (प.).
निसर्गचित्रांचे प्रदर्शन
निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. मात्र सध्या निसर्गातील झाडांचे, त्यांच्या फुला-फळांचे महत्त्व कमी होत असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत निसर्गाची नव्याने ओळख व्हावी तसेच दुर्मीळ फुलांची माहिती व्हावी यासाठी छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुशांत करंदीकर आणि प्रसाद वेलणकर यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. त्यांनी टिपलेल्या विविध प्रकारच्या २०० फुलांची छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या फुलांचे आयुर्वेदिक उपयोगही या प्रदर्शनात नमूद करण्यात आले आहेत.
कधी- रविवापर्यंत, वेळ- स. १०.३० ते रात्री ९.
कुठे- समाज गायन कल्याण सभागृह, कल्याण (प.).
मन करा रे प्रसन्न
रोजच्या धकाधकीच्या जीवनात मनमोकळे हसण्यापेक्षा ताणतणावाचेच प्रसंग अधिक येतात. रविवार हा सुट्टीचा दिवस असला तरी स्पर्धात्मक युगामुळे हल्ली सुट्टीच्या दिवशीही तुम्ही कामातच दंग असता. दिवसभरातल्या कमीत कमी एका तासात साठ वेळा कधी हसले आहात का? नाही ना, तर मग संजय उपाध्ये यांच्या मन करा रे प्रसन्न या कार्यक्रमाला नक्की जा. ऋतुरंग संस्थेच्या वतीने काकासाहेब मराठे ऊर्फ योगीदास यांच्या ८२व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रात गाजत असलेले गप्पाष्टककार संजय उपाध्ये यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी रविवारी ठाणेकरांना चालून आली आहे. दैनंदिन जीवनातील घटनांचा संदर्भ देत हा कार्यक्रम रंगतो. मनाच्या अप्रसन्नतेची कारणे आणि स्वत:चे व दुसऱ्याचे मन कसे प्रसन्न करायचे याचे हजारो उपाय डॉ. उपाध्ये सांगतात.
कुठे- सहयोग मंदिर, दुसरा मजला, ठाणे (प.).
कधी- २ एप्रिलला सायंकाळी ५.३० वाजता.
कॉफीसोबत कविता
शब्द जेव्हा कवितेत गुंफले जातात, तेव्हा त्या कवितांमधून अर्थाचा सुवास पसरतो. जेव्हा शब्द आकाशाला बिलगतात, तेव्हा ते स्वर्गातून फेरफटका मारून येतात. मग हे शब्द कधी मनाला घायाळ करतात तर कधी मनाला प्रसन्नता मिळण्यासाठी धडपडतात. नदीचा त्रिवेणी संगम झाल्यानंतर पाण्याला प्रत्येक नदीप्रमाणे वेगळे करता येत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा कवी, लेखक, कलाकार, संगीतकार एकत्र येतात, तेव्हा त्यांना शब्दांपासून वेगळे करणे शक्य नसते. या कलाकारांचा संगम मंगळवारी ‘पोएट्री टय़ुसडे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. या वेळी ‘एस्केप फ्रॉम हेवन’ असा विषय देण्यात आला आहे. स्वर्ग ही तर कवींची आवडीची जागा असते. त्यामुळे भाषेचे बंधन न ठेवता कवींना आपला विचार कवितेतून व्यक्त करता येईल. अधिक माहितीसाठी अनिश व्यवहारे ८०८०२६५८४१.
कधी- मंगळवार, ५ एप्रिल, वेळ – सायंकाळी.
कुठे- कॅफे वर्व, तलावपाळीजवळ, ठाणे (प.).
हिरवाईच्या सानिध्यात ‘वीकेण्ड’
उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत अशा वेळी एखाद्या झाडाची सावली मिळावी तसेच वाऱ्याची झुळूक यावी आणि सारा थकवा दूर व्हावा असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र आधुनिकीकरणाच्या या जगात सध्या झाडांची मोठय़ा प्रमाणात कत्तल होताना दिसत आहे. श्वास घेण्यासाठी आपल्याला या वृक्षांचा अगदी सहज उपयोग होतो. म्हणूनच हिरव्यागार आणि सतत मानवजातीवर प्रेम करणाऱ्या वृक्षावर आपणही कसे प्रेम करावे तसेच त्या प्रत्येक वृक्षाची माहिती जाणून घेण्यासाठी फर्न या संस्थेतर्फे हिरव्यागार वृक्षांसोबत ‘वीकेण्ड’ जावा यासाठी वृक्ष परिचय या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिशिर ऋतूमध्ये फुलून गेलेल्या वृक्षांना आलेली कोवळी पालवी बघणे आणि त्याच्या वृक्षांसोबत आनंद लुटणे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये शिसम, कुम्भा, हुंब, पेटारी, अंबाडा, काकड, पांगारा, खौशी, किनई, मोह, शिवण, मोई, कुसुम, इ. वृक्षांचा अभ्यास करता येईल.
कधी- रविवार, ३ एप्रिल, वेळ- सकाळी ७.३० ते १०.३०.
कुठे- येऊर पायथ्याशी, राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार.
पाश्चिमात्य नृत्याचे धडे
नृत्याचे नाव काढले तरी कानात संगीत वाजायला लागते, पाय थरकू लागतात. आनंदाच्या प्रसंगी आपण नृत्य करतो. आजकाल फिटनेसाठीही नृत्याचे धडे घेतले जातात. आता तरमुलांच्या परीक्षा संपत आल्या आहेत. त्यामुळे नृत्याच्या शिबिरांचा शोध घेत असाल तर येत्या आठवडय़ात एक चांगली संधी आहे. सालसा, बचाता, मिरेंगे, जाइव्ह आदी नृत्य शिकण्याची अनोखी संधी कलाकारांना चालून आली आहे. नकुल घाणेकर संचालित डिफरंट स्ट्रोक्स या संस्थेने हे खास नृत्य शिबीर आयोजिन केले आहे. विशेष म्हणजे बच्चे कंपनीबरोबरच ७० वर्षांच्या वयोवृद्धापर्यंत कोणतेही नृत्यप्रेमी स्त्री-पुरुषांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे.
कधी- ४ ते ७ एप्रिल, वेळ – सकाळी ७ ते ८ आणि संध्याकाळी ८ ते ९.
कुठे- बेसमेंट, वासुदेव सदन, रामवाडी ठाणे (प.).
खुल के नाचो, नाचो..
दुसऱ्यांना नृत्य करताना पाहिल्यानंतर आपल्यालाही छान नाचता यावे असे प्रत्येकाला वाटत असते. कंटाळा आल्यानंतर कोणतीही कला चैतन्य निर्माण करते. त्यामुळे कलेला आत्मसात करणे, त्या कलेशी मैत्री करणे खूप गरजेचे असते. त्यामुळेच एन. स्टाइल इन्स्टिटय़ूट ऑफ डान्स या संस्थेतर्फे नृत्य करण्याचा कोणताही अनुभव नसला तरीही प्रशिक्षण दिले जाते, त्यामुळे फिटनेस राखण्यासाठीही मदत होणार असून नृत्य करता येत नसलेल्यांनाही सालसा नृत्य करता येईल. त्यासाठी कोणत्याही जोडीदाराची गरज नसल्याचेही संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : निमेष बिजलानी ९८७०७८२०३०.
कधी- सोमवार ४ एप्रिल, वेळ- दुपारी ३ ते ४ आणि सायंकाळी ४ ते ५.
कुठे- डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृह, हिरानंदानी मेडॉज, ठाणे (प.).