ठाणे
सर्वसामान्य भारतीयांना परदेशाविषयी कायम कुतूहल वाटत असते. विशेषत: युरोप खंडाविषयी अनेकांना आकर्षण असते. न्यूयॉर्कस्थित छायाचित्रकार निखिल घोडके यांनी युरोप आणि आशिया खंडात काढलेल्या वैशिष्टय़पूर्ण छायाचित्रांचे प्रदर्शन ठाणेकरांना या आठवडय़ात पाहता येणार आहे. या दोन्ही खंडांतील
संस्कृती, भौगोलिक वैशिष्टय़े आणि निसर्गसौंदर्याचे दर्शन या छायाचित्र प्रदर्शनातून घडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे निवृत्त मुख्य वास्तुविशारद
वि.रा. अत्रे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
कधी : २ ते ४ जुलै,
केव्हा: सकाळी १० ते सायंकाळी ७
कुठे : कलाभवन, कापुरबावडी, बिग बझारजवळ, ठाणे (प.)ू
म्यानमारची ‘शब्दसफर’
युरोप-अमेरिकेविषयी आपल्याला बरीच माहिती मिळते. मात्र आपल्या शेजारील राष्ट्रांविषयी मात्र अनभिज्ञ असतो. भारताचे एक शेजारी राष्ट्र असलेला पूर्वाश्रमीचा ब्रह्मदेश तसेच आजच्या म्यानमारविषयीसुद्धा असेच म्हणता येतील. ‘मेरे पिया गये रंगून, किया है वहा से टेलिफून’ हे चित्रपटगीत जुन्या काळात बरेच गाजले होते. खरे तर त्या वेळी ब्रह्मदेशातून भारतात थेट दूरध्वनी सेवा नव्हती. तर अशा या आपल्या शेजारी असलेल्या ब्रह्मदेशाची एक ‘शब्दसफर’ अंबरनाथमध्ये रविवारी आयोजित करण्यात आली आहे.
मनोहर कला सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने ‘एक वक्ता एक देश’ या उपक्रमांतर्गत म्यानमार ऊर्फ ब्रह्मदेश या देशाविषयी मनोरंजकमाहिती सुप्रसिद्ध लेखक प्रवीण कारखानीस देणार आहेत.
- कधी : ३ जुलै,
- केव्हा: सायंकाळी ६ वाजता
- कुठे : कमलांकित, दुसरा मजला, दत्त मंदिराजवळ, कानसई, अंबरनाथ (पूर्व)
ठाणेकरांसाठी ‘हास्ययोग’
मन प्रसन्न आणि तणावरहित ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे हास्य. उत्तम विनोदाने हास्यनिर्मिती होते. येत्या आठवडय़ात ठाणेकरांसाठी पोट धरून हसण्याचा उत्तम योग आहे. ‘द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियातर्फे’ शुक्रवारी १ जुलै रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात दुपारी साडेतीन वाजता हिंदी हास्यकवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सुरेश मिश्रा, नवनीत हुल्लड, राना तब्बासम, सुनील सर्वा, मुकेश गौतमसारखे दिग्गज हास्यकवी आपल्या मनमुराद हसविणाऱ्या काव्यरचना घेऊन ठाणेकरांच्या भेटीस येत आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकरही या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
- कधी- शुक्रवार, १ जुलै,
- केव्हा: दुपारी ३.३० ते सायंकाळी ७
- कुठे : मिनी थिएटर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे(प.)
डोंबिवलीत सदाबहार ‘जीवनगाणी’
सदाबहार गाणी कधीही कालबाह्य़ होत नाहीत. मोगऱ्याच्या फुलांसारखी ती सदासर्वकाळ ताजी, टवटवीत असतात. त्यामुळे अशा गाण्यांच्या मैफलींना अस्सल रसिक कायम दाद देत असतात. अशीच एक शब्दसुरांची ‘जीवनगाणी’ ही मैफल येत्या शनिवारी डोंबिवलीत आयोजित करण्यात आली आहे. रघुलीला एंटरप्रायझेसच्या वतीने आयोजित या मैफलीत हृषीकेश अभ्यंकर, गायत्री शिधये, केतकी भावे-जोशी, धनंजय म्हसकर आदी गायक सदाबहार गाणी सादर करणार आहेत.
- कधी : शनिवार, २ जुलै,
- केव्हा : सायंकाळी ६ वाजता.
- कुठे- सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली.
छत्र्यांची रंगशाळा
पावसाच्या पाण्याला कोणताही रंग नसला तरी त्यापासून बचाव करणाऱ्या छत्र्या मात्र रंगीबेरंगी असतात. येत्या रविवारी ठाण्यातील टाऊन हॉलमध्ये छत्र्या रंगविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पूर्वनोंदणी करून इच्छुकांना या कार्यशाळेत सहभागी होता येईल.
संपर्क- ८८७९०६३३१२ किंवा ९८१९५०५९०७.
- कधी : रविवार, ३ जुलै,
- केव्हा: सकाळी ११
- कुठे : टाऊन हॉल, कोर्टनाका, ठाणे (प.)
हृषीकेश रानडेंची मैफील
कलाकाराची कला नेहमीच त्या कलाकाराला स्वत:ची ओळख करून देते. याच कलेतून हृषीकेश रानडे यांनादेखील स्वत:ची ओळख निर्माण करून दिली. संगीताला कधीच काळ, वेळ, वय यांचे बंधन नसते, हे आपल्या गाण्यातून हृषीकेशने वेळोवेळी सिद्ध केले आहे. संगीतामुळे मनोरंजन तर होतेच शिवाय मन प्रसन्न होते. त्यामुळे गाणी ऐकण्याची वाट अनेक रसिक धरतात आणि संगीतात रममाण होतात. अशाच एका सांगीतिक मैफिलीत रममाण होण्याची आणि हृषीकेश रानडेंचा प्रत्यक्ष आवाज ऐकण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे. या वेळी नवीन गाण्यांसह जुन्या गाण्यांचीही मैफील रंगणार आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गायिका प्राजक्ता रानडेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
- कधी : रविवार ३ जुलै,
- केव्हा : सायंकाळी ८.३० वाजता
- कुठे : गडकरी रंगायतन, ठाणे (प.)
ठाण्यात ‘अभंगवाणी’
महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा आहे. त्यांनी आपल्या रचनांमधून येथील समाजमन घडविले आहे. त्यावर अध्यात्म विचारांचे संस्कार केले आहेत. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो सश्रद्ध वारकरी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. येऊ घातलेल्या आषाढी एकादशीनिमित्ताने पं. राहुल देशपांडे यांनी गायलेल्या भक्तीपर रचनांची ‘अभंगवाणी’ ही विशेष मैफल रविवारी, ३ जुलै रोजी ठाण्यात आयोजित करण्यात आली आहे. संगीत संयोजन चैतन्य कुंटे यांनी केले असून चैतन्य महाराज देगलूरकर मैफलीचे निरूपण करणार आहेत.
- कधी: शनिवार, २ जुलै,
- केव्हा: रात्री ८.३० वाजता
- कुठे : गडकरी रंगायतन, ठाणे