ठाणे : महापालिकेतील महापौर आणि सर्वच नगरसेवकांचा पंचवार्षिक कार्यकाळ एक वर्षांपुर्वीच संपुष्टात आल्यामुळे हे सर्वचजण सर्वसामान्य नागरिक झाले असतानाही हे सर्वजण महापालिकेतील पक्ष कार्यालय, महापौर दालन आणि महापौर निवासामध्ये ठाण मांडून बसण्याबरोबरच ठाणेकरांच्या कराच्या पैशाची नासाडी करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी केला आहे. त्यामुळे माजी महापौर तसेच नगरसेवकांना पालिकेतील कार्यालयांमध्ये बसण्यास बंदी घालून कायार्लये बंद करावीत, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली असून ही मागणी मान्य झाली नाहीतर ठाणेकरांना सोबत घेऊन महापालिका मुख्यालयात आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा >>> कल्याण : विदेशी चलानातून गुंतवणूकदारांची फसवणूक करणारी टोळी अटकेत; कल्याणमधील कोळसेवाडी पोलिसांची कारवाई
ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपलेली असून अद्याप निवडणुका झालेल्या नाहीत. तरीही माजी महापौर आणि सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक हे आजही नगरसेवक असल्यासारखे वागतात. माजी महापौर हे आज महापौर असल्याचेच लोकांना भासवित असून ही जनतेची आणि शासनाची फसवणूक आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. सर्व माजी नगरसेवक हे आता सर्वसामान्य नागरिक असून सामान्य जनतेप्रमाणेच ते केवळ महापालिकेत कामासाठी येऊ शकतात. परंतु महापालिकेत प्रशासक नियुक्ती झालेली असतानाही माजी महापौर आणि माजी नगरसेवक हे आजही पालिकेतील पक्ष कार्यालयात ठाण मांडून बसलेले दिसतात. या कार्यालयांमध्ये ठाणेकरांच्या करातून जमा होणाऱ्या पैशातून चहापानावर खर्च केले जात असून त्याचबरोबर कर्मचारी आणि वाहनांचाही वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महापालिका मुख्यालयातील महापौर दालन, पक्ष कार्यालये, परिवहन सभापती कार्यालय, महापौर निवास हे तातडीने बंद करण्यात यावे अशी लेखी मागणी दोन महिन्यांपुर्वी केलेली आहे. मात्र यावर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही. या माजी नगरसेवकांना पालिका मुख्यालयातील दालनाचा ताबा घेण्यापासून रोखून ठाणेकरांच्या कररुपी महसुलाच्या नासाडीला चाप लावावा, अन्यथा सर्वसामान्य ठाणेकर जनतेला पालिका मुख्यालयात येऊन निशुल्क सर्व दालने हॉल वापरण्याकरीता परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. येत्या आठ दिवसात याबाबत ठोस निर्णय घेतला नाहीतर सर्वसामान्य जनतेला घेऊन ठाणे महापालिका मुख्यालयात घुसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पालिका आयुक्त आजही माजी महापौर नरेश मस्के यांच्या आदेशाने चालतात का
माजी नगरसेवक हे आजही मुख्यालयात बसून नगरसेवक असल्याप्रमाणे प्रशासनाला सूचना आणि आदेश देत असल्याचे आमच्या निदर्शनात आले असून दिव्यातील एका कार्यक्रमात माजी महापौर नरेश मस्के यांनी महापौर असल्यागत आणि इतर माजी नगरसेवकांचा नगरसेवक असल्याचा उल्लेख करत दिव्याची कचराभुमी ३१ तारखेला बंद होणार असल्याचे जाहीर केले. मुळात ते महापौर नसताना त्यांनी कोणत्या अधिकारात ३१ तारीख जाहीर केली, याचा खुलासा पालिका आयुक्तांनी करावा. पालिका आयुक्त आजही माजी महापौर नरेश मस्के यांच्या आदेशाने चालतात का, म्हस्के यांची महापालिका प्रशासनाने प्रवक्ता म्हणून नियुक्ती केलेली आहे का, धुतराष्ट्राच्या भूमिकेत गेलेले आयुक्त बांगर हे महापालिका गोल्डन गॅंग सोबत सामील झालेले आहेत का असे प्रश्न उपस्थित करत याबाबात स्पष्टीकरण देण्याची मागणी घाडीगावकर यांनी केली आहे.