ठाणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जेव्हा ठाण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे. त्यामुळे युती करायची की नाही करायची हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील आणि नेते जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल, असे सुचक विधान भाजपचे नेते व माजी खासदार संजीव नाईक यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केले.
भाजपचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा २४ फेब्रुवारीला जनता दरबार होणार असून तेथील व्यवस्थेचा आढावा माजी खासदार संजीव नाईक यांनी शनिवारी घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पालिका निवडणुकांबाबत भाष्य केले. भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. राज्यात एक कोटी सदस्यांचा टप्पा पार झाला असून लवकरच पक्षाचे ३ कोटी सदस्य होतील. प्रत्येकजण आपले पक्ष संघटन मजबूत होण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यात काहीच गैर नाही.
संघटन वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देणे गरजेचे आहे, असे संजीव नाईक म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जेव्हा ठाण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे. त्यामुळे युती करायची की नाही करायची हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील आणि नेते जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल, असे सुचक विधानही त्यांनी केले. वनमंत्री गणेश नाईक यांचा दहा वर्षानंतर हा जनता दरबारा होत असून नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत.
यामुळेच आतापर्यंत दिडशेहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. यामुळे जनता दरबारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे जनता दरबारासाठी पोलिस अधिकारी, महसुल अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी या सर्वांनी कशी व्यवस्था केली आहे, याचा आढावा घेण्यात आला. कारण, हा जनतेचा दरबार असून येथे त्यांच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत, असे संजीव नाईक यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वन मंत्री गणेश नाईक आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे ठाणे जिल्ह्यातील तिन्ही नेते राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे जास्तीत जास्त प्रश्न सुटतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच सांगत आहे की, लोकांमध्ये जाऊन काम करा. त्यामुळेच हा जनता दरबार घेण्यात येत आहे. कारण, एक मंत्री मंत्रालयात पाच नागरिकांना भेटतो. पण, तोच मंत्री जिल्ह्यात गेला तर, तेथील पाच हजाराहून अधिक लोकांना भेटतो आणि त्यांचा जनसंपर्कही वाढतो, असेही ते म्हणाले.