कल्याण : कल्याण जवळील वडवली भागातील निर्मल लाईफ स्टाईल गृहसंकुल समोरील भागात माजी नगरसेवक दुर्याेधन पाटील आणि त्यांच्या दोन मुलांनी बेकायदा चाळींची बांधकामे केली आहेत. या बेकायदा बांधकामांची पाहणी करण्यासाठी बुधवारी संध्याकाळी वरिष्ठांच्या आदेशावरून अ प्रभागाचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे आणि पथक पाहणीसाठी करण्यासाठी गेले होते. यावेळी आमच्या बांधकामांच्या ठिकाणी तुम्ही आलेच कसे, असे प्रश्न करत माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, त्यांची दोन मुले वैभव आणि पंकज पाटील यांनी पालिकेच्या पथकाला लाकडी दांडक्यांनी मारहाण करून गोंधळ घातला.

या मारहाण प्रकरणी अ प्रभाग अतिक्रमण नियंत्रण विभागाचे पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक दुर्याधन पाटील (५५), त्यांची दोन मुले वैभव (३०) आणि पंकज पाटील (२६) यांच्या विरुध्द वरिष्ठांच्या निर्देशावरून मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणला असल्याची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

पाच वर्षापूर्वीही माजी नगरसेवक दुर्याधन पाटील यांनी वडवली भागात बेकायदा बांधकामांच्या कारवाईसाठी गेलेल्या दोन पालिका कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले होते, असे तक्रारदार साळुंखे यांनी सांगितले. बेकायदा बांधकामे करुनही भूमाफिया मुजोरी करत असतील तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, या विचारातून प्रशासनाने हा गुन्हा दाखल केला.

पथकप्रमुख साळुंखे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजता आपण अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या निर्देशावरून अधीक्षक शिरीष गर्गे, अतिक्रमण नियंत्रण पथकासह वडवली निर्मल लाईफ स्टाईल परिसरातील समोरील भागात उभारण्यात आलेल्या भागात बेकायदा चाळी आणि इतर बेकायदा बांधकामांची पाहणी करण्यासाठी गेलो होतो.

तेथे वैभव दुर्याधन पाटील, पंकज दुर्योधन पाटील आले. त्यांनी ‘तुम्ही आमच्या बांधकामांच्या ठिकाणी आलेच, तुमची हिम्मत झालीच कशी येथे येण्याची, तुम्ही कोणाला विचारून येथे आला आहात, असे प्रश्न करून वैभव यांनी तुम्हाला गोळ्या घालायला पाहिजे, अशी धमकी पथकाला दिली. साळुंखे यांना मारण्याची आणि बदलीची धमकी दिली. वैभव यांनी माजी नगरसेवक वडील दुर्याधन यांना बोलावले. ते हातात लाकडी दांडूक घेऊन आले. त्यांनी पाहणी पथकाला शिवीगाळ करत रागाच्या भरात अधीक्षक शिरीष गर्गे यांना दांडकाचे पाठीमागून फटके मारले.

पथकातील कामगार टाक, भाकरे यांच्या पायावर फटके मारले. साळुंखे यांच्या कानशिलात दुर्योधन यांनी चापटी मारल्या. नियंत्रण पथकाच्या वाहनाची काच फोडली. बेभान झालेले पाटील कुटुंबीय आपल्या जीवाचे बरेवाईट करतील या भीतीने साळुंखे यांनी तात्काळ साहाय्यक आयुक्त पाटील यांना घटनास्थळी बोलविले. हे पथक तक्रारीच्या अनुशंगाने बांधकामांच्या पाहणीसाठी आले आहे, असे दुर्योधन यांना साहाय्यक आयुक्त पाटील यांनी सांगितले. तेथे प्रकरण शांत करून सरकारी कामात अडथळा आणल्याने वरिष्ठांच्या आदेशावरून तिन्ही मारेकऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.