नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या अवैध मद्यविक्रीवर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला आहे. विभागाने संपूर्ण जिल्ह्यात पाच भरारी पथके नेमून कारवाईस वेग आणला आहे. नुकताच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलात मद्य परवाना नसलेल्या १२ धाब्यांवर अवैध मद्यविक्री केल्याप्रकरणी पथकाने कारवाई केली आहे. यात पथकाने १२ जणांना अटकही केली आहे. अशाप्रकारची कारवाई संपूर्ण जिल्ह्यात सुरू राहणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे जिल्हा हा मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असल्याने नाताळ तसेच नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील पर्यटनाच्या ठिकाणी छुप्या पद्धतीने मद्यपार्ट्यांचे आयोजन केले जात असते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्रातही अशीच परिस्थिती आहे. हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असूनही या भागात मोठ्याप्रमाणात धाबे तयार झाले आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेकदा रात्री उशीरापर्यंत या भागात मद्यपार्ट्या सुरू असल्याच्या तक्रारी पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून केल्या जातात.
येथील अनेक धाबे मालक नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला छुप्या पद्धतीने मद्य विक्री करत असतात. त्यांच्याकडे उत्पादन शुल्क विभागाचा मद्य विक्रीचा परवानाही नसतो. अशाप्रकारच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पाच भरारी पथके तयार केली आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री येऊरच्या जंगलात काही धाब्यांवर मद्याची विक्री सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याआधारे, पथकाचे निरीक्षक शिवशंकर पाटील, दुय्यम निरीक्षक सलीम शेख, मनोज संबोधी यांच्या पथकाने येऊरमध्ये जाऊन कारवाई केली. या कारवाईत १२ धाब्यांमधून २१ हजार ९३९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच १२ धाबे मालकांना अटक केली. त्यामुळे येथील अवैध मद्यविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा: कल्याण: आंबिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासनिसावर प्रवाशाचा प्राणघातक हल्ला
आगामी नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येच्या पाश्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्यात ही कारवाई सुरू राहील. – निलेश सांगडे, अधीक्षक, उत्पादन सुल्क विभाग, ठाणे</p>