कल्याण : मानवी भाव-भावना निसर्गाशी समरुप करुन भावनांचे वास्तवदर्शी कंगोरे उलगडणारे चित्र प्रदर्शन मुंबईतील जहांगिरी आर्ट गॅलरीमध्ये २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केले आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तीन चित्रकारांनी ही चित्रे काढली आहेत. अभिनेत्री आणि संस्कृती कला दर्पणच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत.
मुंबईतील फोर्ट भागातील काळा घोडा जवळील हिरजी जहांगिर आर्ट गॅलरीमधील हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत नागरिकांसाठी खुले असणार आहे. अभिव्यक्ति ग्रुप आर्टतर्फे आयोजित या प्रदर्शनात उज्जवल पारगावकर, धीरज पाटील, प्रदीप घाडगे या चित्रकारांचा सहभाग आहे. पारगावकर यांनी मृत चित्र निर्मितीला छेद देत चित्र आकाराची सीमारेषा बाजुला सारून अमृत शैलीतून चित्रातून रंगांचा मुक्त अविष्कार चितारला आहे.
मानवी मनाचे कंगोरे चित्रातून पाटील यांनी व्यक्त केले आहेत. भक्तिमय अनुभव घाडगे यांनी रंगलेपनाच्या शैलीतून व्यक्त केले आहेत. पारगावकर हे कला शिक्षक आहेत. दिल्ली, गोवा, मुंबई, दादरा नगर हवेली येथील कला प्रदर्शनात यांनी यापूर्वी सहभाग घेतला आहे. चित्रकलेतील उत्तम कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत.