लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या डोंबिवलीतील एका तरूणाने हातात सुरा घेऊन डोंबिवली पूर्वेतील शेलारनाका भागात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दहशत निर्माण केली. या दहशतीने नागरिक सैरावैरा पळू लागले. वाहन चालकांनी भीतीपोटी वाहने जागोजागी थांबविल्याने शेलार नाका भागात वाहतूक कोंडी झाली. टिळकनगर पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास करून या तरूणाला अटक केली.
हुसेन मोहम्मद पावटे (२८) असे या तरूणाचे नाव आहे. तो शेलार कार्यालयामागील इंदिरानगर झोपडपट्टीत राहतो. हुसेनची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन पोलीस उपायुक्तांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये हुसेनला ठाणे जिल्ह्यातील कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे तालुक्यातून १२ महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. हुसने विरुध्द टिळकनगर पोलीस ठाण्यातील हवालदार देविदास गिरासे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यातील तक्रारीत हवालदार गिरासे यांनी म्हटले आहे, हुसेन पावटे हा ठाणे जिल्ह्यातून काही तालुक्यांमधून हद्दपार असताना तो हद्दपारी आदेशाचा भंग करून डोंबिवलीत दाखल झाला होता. त्याने पु्न्हा डोंबिवलीतील शेलारनाका, इंदिरानगर झोपडपट्टी भागात आपली दहशत माजविण्यास सुरुवात केली होती. एक दिवस हुसेन याने दुपारच्या वेळेत हातात १६ इंच लांबीचा धारदार सुरा हातात घेतला. सुरा घेऊन तो शेलार नाका भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर येऊन सुरा हवेत फिरवून दहशत पसरवू लागला. या दहशतीमुळे पादचारी जागोजागी थांबले, वाहने खोळंबून शेलारनाका भागात वाहतूक कोंडी झाली. शाळेच्या बस या कोंडीत अडकल्या.
एक सुराधारी इसम शेलार नाका भागात दहशत पसरवित असल्याची माहिती टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांना मिळाली. त्यांनी तातडीने उपनिरीक्षक आर. वाय. चौगुले, हवालदार एस. के. कांबळे, यु. एम. राठोड यांना शेलार चौकात पाठविले. पोलीस पथक घटनास्थळी येईपर्यंत हुसेन शेलार नाका भागातून पळून गेला होता.
पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने हल्लेखोराची ओळख पटवली. त्याचा परिसरात शोध सुरू केला. डोंबिवली जीमखान्याच्या संरक्षित भिंतीलगत एक इसम चोरून बसला असल्याचे पोलिसांना दिसले. पोलीस त्याच्या दिशेने जाताच त्याने जवळील धारदार वस्तू लपविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला पळून न देता त्याच्यावर झडप घालून अटक केली.
शेलार चौकात दहशत पसरविणारा इसम हा हद्दपार केलेला हुसेन पावटे असल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्र पोलीस कायद्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पुन्हा हद्दपारी तालुक्याच्या बाहेर सोडण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.