ठाणे : येथील किसननगर तसेच श्रीनगर भागातील मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रूग्णालयात उत्तम दर्जाची रुग्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून या सुविधांचा आणखी विस्तार करण्यासाठी पालिका प्रशासन सकारात्मक असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. किसननगर- वागळे इस्टेट पाहणी दौऱ्यादरम्यान आयुक्त बांगर यांनी मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रूग्णालयालाही भेट देऊन पाचही मजल्यावरील कामकाज, व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णालयाजवळच असलेल्या पालिकेच्या मीनाताई ठाकरे प्रसूतीगृहात प्रसुती शस्त्रक्रिया व्यवस्था लवकरात लवकर उपलब्ध करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी आरोग्य विभागास दिले.
हेही वाचा >>> कळवा नवीन खाडी पुलासह शीळ उड्डाणपुलाच्या लोकार्पणास मुहूर्त मिळला
तळमजल्यावरील बाह्यरुग्ण कक्षात स्वाभाविकपणे सर्वाधिक गर्दी होती. तेथे रुग्णांच्या नातेवाईकांशी आयुक्तांनी संवाद साधला. तसेच, येथील शौचालयांची पाहणी केली. बाह्यरुग्ण कक्षातील गर्दी लक्षात घेता ही शौचालये वेळोवेळी स्वच्छ झाली पाहिजेत, अशा सूचना त्यांनी रुग्णालय व्यवस्थापकांना दिल्या. रुग्णालयांच्या पायऱ्यांवर काही रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक नंबर येण्याची वाट पाहत बसले होते. त्यांच्यामुळे रुग्णालयांच्या कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून जिन्याच्या कोपऱ्यात बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्याची सुचना त्यांनी केली. एकंदर स्वच्छतेबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. त्याचवेळी, रुग्ण संपर्कासाठी दिलेला कॉल सेंटरचा एक नंबर बंद असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. दुसरा नंबर वापरात असल्याचे व्यवस्थापनाने सांगताच तो फोन नंबर सगळीकडे दिसेल अशा पद्धतीने लावण्याची सूचना त्यांनी केली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची पाहणी करताना आयुक्तांनी काही सूचना केल्या. जेवण गरम असावे, चांगल्या दर्जाचे असावे, हातमोजे घालूनच वाढले जावे, जेवण देताना नीट काळजी घेतली जावी, असे आयुक्त म्हणाले. या रुग्णालयाची अग्निसूरक्षा चाचणी करण्याचे निर्देशही त्यांनी अग्निशमन अधिकाऱ्यांना दिले. तसेच, रूग्णालयासमोरील गटारची तुटलेली झाकणे ताबडतोब बदलण्यास उपायुक्त शंकर पाटोळे यांना सांगितले.
हेही वाचा >>> मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवलीत रविवारी किलबिल महोत्सव
सक्षमीकरणासाठी पूर्ण सहकार्य
मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या माध्यमातून उत्तम दर्जाची रुग्ण सेवा ठामपाने उपलब्ध केली आहे. नागरिकांचा प्रतिसादही चांगला आहे. या रुग्णालयाचे सक्षमीकरण व्हावे, महापालिका आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना करू.
अभिजीत बांगर आयुक्त, ठाणे महापालिका