राज्य सरकारने सोमवारी सायंकाळी उशीरा जाहीर केलेल्या नवीन रेडी रेकनर दरांविरोधात ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील बांधकाम व्यवसायिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. करोना काळानंतर आता बांधकाम उद्योग सावरत असताना या नव्या दरांमुळे घरांच्या किंमती वाढतील आणि मागणी कमी होईल, अशी भिती बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. पुनर्विकासाच्या माध्यमातून नवनिर्माणाचे स्वप्न पाहाणाऱ्या उल्हासनगर, नवी मुंबई या सारख्या शहरांना या निर्णयाचा मोठा फटका बसेल असा दावा या भागातील बांधकाम व्यवसायिक करीत आहेत.

ठाणे शहरातील रेडीरेकनरच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ करण्यात आल्यामुळे कमालीची अस्वस्थता पसरली असून या दरवाढीमुळे बांधकाम व्यवसायावर परिणाम होण्याची भिती बिल्डरांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, या दरवाढीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.रेडीरेकनरच्या दरवाढीबाबत क्रेडाई एमसीएचआय ठाणे या बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दरवाढीमुळे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कात वाढ होईल आणि यामुळे घरांच्या किंमती वाढून त्या ग्राहकांना परवडणार नाहीत. त्याचबरोबर घर खरेदीदारांच्या भावनांवरही परिणाम होईल आणि यामुळे ठाण्यातील घरांची मागणी कमी होऊ शकते, अशी भिती मेहता यांनी व्यक्त केली आहे. रेडी रेकनर दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ केल्याने बांधकाम क्षेत्राला धक्का बसल्याचे मेहता यांनी सांगत या वाढीचा घर खरेदीदार, विकासक आणि एकूण बांधकाम क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. वाढलेले रेडी रेकनर दर विकासकांसाठी देखील आव्हाने निर्माण करतील. विकासक आधीच वाढत्या बांधकाम खर्चाचा आणि नियामक अनुपालन खर्चाचा सामना करत आहेत. या वाढीमुळे त्यांचे आधीच कमी झालेला नफा आता आणखी कमी होईल. यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय टिकवणे कठीण होईल, असे मेहता यांनी म्हटले आहे.

परवडणाऱ्या घरांच्या पर्यायांमुळे, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे आणि नोकरीच्या संधींमुळे ठाणे हे घर खरेदीदारांसाठी एक पसंतीचे ठिकाण आहे. परंतु रेडी रेकनर दरांमध्ये वाढ झाल्याने ठाण्याच्या बांधकाम क्षेत्राची वाढ मंदावू शकते. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या संधींवर परिणाम होऊ शकतो, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे. रेडी रेकनर दरांमध्ये वाढ करण्याचा पुनर्विचार करावा आणि त्याचबरोबर विकासक आणि घर खरेदीदारांसाठी अधिक अनुकूल व्यवसाय वातावरण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच राज्य सरकार आमच्या चिंता विचारात घेईल आणि महाराष्ट्राच्या बांधकाम क्षेत्रासाठी अधिक सकारात्मक आणि विकासाभिमुख वातावरण निर्माण करण्यासाठी काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

कोलशेतमध्ये घरांच्या बाबतीत रेडी रेकनर दरात २० टक्के वाढ झाली आहे. दुकाने आणि कार्यालयांच्या बाबतीतही अशीच वाढ झाली आहे. ढोकळीमध्ये, घरांच्या बाबतीत रेडी रेकनर दरात २० टक्के वाढ झाली आहे. दुकाने आणि कार्यालयांच्या बाबतीतही अशीच वाढ झाली आहे. कावेसरमध्ये, घरांसाठी रेडी रेकनर दरात १८ टक्के वाढ झाली आहे. कार्यालयासाठी १९ टक्के आहे. नौपाडामध्ये घरांसाठी रेडी रेकनर दरात २० टक्के वाढ झाली आहे. पाचपाखाडीमध्ये घरांसाठी रेडी रेकनर दरात १५ टक्के, दुकानांसाठी २० टक्के आणि कार्यालयासाठी २० टक्के वाढ आहे, असे जितेंद्र मेहता यांनी म्हटले आहे.