एसटी संपामुळे कोकणातील विशेष गाडय़ांचे अद्याप नियोजन नाही, प्रवाशांची खासगी वाहतुकीकडे धाव
निखिल अहिरे, आकांक्षा मोहिते
ठाणे : करोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जिल्ह्यातील कोकणवासीयांना शिमगोत्सव साजरा करण्यासाठी मूळ गावी जाता आले नव्हते. यंदा सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव ओसरत आहे. असे असले तरी ठाणे एसटी विभागातील बहुतांश कर्मचारी अजूनही संपावर आहेत. यामुळे ठाण्यातून कोकणाच्या दिशेने जाण्यासाठी एसटी गाडय़ांचे कोणतेही नियोजन अद्याप झालेले नाही. नागरिकांना आता एसटीच्या दरापेक्षा दुप्पट पैसे भरून कोकणात जाण्यासाठी खासगी बसचे आरक्षण करावे लागत आहे. कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचे आरक्षण तसेच खासगी वाहनांचे भाडेदरही या काळात वाढल्याने यंदाचा शिमगा कोकणवासीयांना महागडा जाणार असल्याचे दिसून येत आहे.
शिमगोत्सवाशी कोकणवासीयांचे जिव्हाळय़ाचे नाते राहिले आहे. होळीच्या आठ दिवस आधीच कोकणात पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सवाची तयारी केली जाते. यंदा फेब्रुवारी महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक नागरिकांनी शिमग्यासाठी कोकणात जाण्याचे बेत आखले आहेत. मात्र, एसटीच्या संपामुळे कोकणवासीयांना एसटीने प्रवास करणे शक्य नाही महाड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खेड, चिपळूण येथे जाण्यासाठी एसटीचे तिकीट दर हे ३५० ते ७०० रुपयांपर्यंत आहेत. तर खासगी बसचे दर हे ९०० ते १५०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
लाखोंच्या उत्पन्नावर पाणी
जिल्ह्यातून दरवर्षी शिमगोत्सवादरम्यान सुमारे २५ हजार नागरिक एसटीने कोकणात जातात. यासाठी ६० ते ७० गाडय़ांचे नियोजन करण्यात येते. यातून ठाणे एसटीला सुमारे ३५ लाख रुपयांचा महसूल मिळतो. मागील वर्षी शिमगोत्सवानिमित्त ठाणे विभागातून ४९ गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. यंदा ठाणे विभागातून कोकणात जाणाऱ्या एका ही गाडीचे नियोजन अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे ठाणे विभागाला दरवर्षी शिमगोत्सवा दरम्यान मिळणाऱ्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे.
विभागात संभ्रमावस्था
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या ठाणे एसटी विभागात ५० कंत्राटी चालक रुजू आहेत. या कंत्राटी चालकांची नेमणूक अनुभवाअभावी केवळ स्थानिक मार्गावर करण्यात आली आहे. तसेच एसटीचे जे कर्मचारी सध्या रुजू झाले आहेत त्यांच्याद्वारे कोकणात होळीसाठी काही गाडय़ा सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, याबाबतही विभागात संभ्रमावस्था असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिमग्याला कोकणात जाण्यासाठी दरवर्षी महिनाभर आधी एसटीच्या तिकिटांची नोंदणी केली जाते. यंदा संपामुळे कोकणात जाण्यासाठी एसटीची सेवा उपलब्ध नसल्याने नाइलाजाने खासगी गाडय़ांचा पर्याय निवडला आहे. खासगी गाडय़ांचे तिकीट दुप्पट असल्याने यंदाचा शिमगा कोकणवासीयांना परवडणारा नाही.
– संतोष निकम, प्रवासी