लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नोटांची उधळण केली. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित झाल्यानंतर आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून शिंदे गटावर टीका केली जात आहे. आनंद दिघे यांचे पत्रव्यवहार पाहणाऱ्या नंदकुमार गोरूले यांनीही याप्रकरणानंतर संताप व्यक्त केला. त्यांनी शिंदे गटावर टीका करत ‘सोन्याच्या पेना’ची आठवण देखील सांगितली.
ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या चरई येथील कार्यालयात आनंद आश्रम येथील नोटांच्या उधळणी प्रकरणी एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये नंदकुमार गोरूले उपस्थित होते. १९८५ ते १९९५ या कालावधीत गोरूले यांनी आनंद दिघे यांचे पत्रव्यवहाराचे कार्य सांभाळले. त्यांनी आनंद दिघे यांच्या मुलाखती देखील लिहील्या आहेत. आनंद दिघे यांची प्रकृती अस्थिर असताना त्यांची सेवा मी केली असा दावा गोरूले यांनी केला आहे. त्यांनी शिंदे गटावर याप्रकरणावरून गंभीर आरोप केले. ते म्हणाले सर्वजण पैशांना वश झाला आहात का? माझ्या साहेबांना तुम्ही पैशांनी ओवाळताय? मराठी, हिंदू सणांचा एक आदर्श वस्तूपाठ म्हणून टेंभीनाक्यातील आनंद आश्रमाकडे पाहिले जात होते. त्याचे आचरण-अनुकरण देशभर व्हायचे. देशभरातील माणसे आनंद आश्रमात यायचे आणि आज तुम्ही सांगत आहात, साहेबांनी ही पंरपरा पाडली. साहेबांच्या नावाने काय-काय खपवता? एवढा पैसा मोठा झाला की, माझ्या साहेबांना तुम्ही विकत घ्याल अशी टीका त्यांनी केली.
आणखी वाचा-लाज असेल तर माफी मागा, माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
आनंद दिघे यांची एक आठवण देखील त्यांनी सांगितली. एक मराठी उद्योजक होते. ते दुबईला पळून गेले असते किंवा त्यांनी आत्महत्या केली असती. अशा माणसाला साहेबांनी वाचविले होते. त्यांना कृतज्ञता म्हणून दिघे साहेबांना काहीतरी द्यायचे होते. माझा भाऊ त्या उद्योजकाचा मित्र होता. त्याने त्या उद्योजकाला समजावले की, साहेबांना काहीही देऊ नका, हे धाडस करू नका… परंतु त्यांचे म्हणणे होते काहीतरी साहेबांना द्यायचे आहे. त्यामुळे त्या उद्योजकाने दुबईहून एक सोन्याचा पेन आणला होता. ते उद्योजक आनंद आश्रमात आले. साहेब समोर बसले होते. मी स्वत: देखील साहेबांसोबत होतो. ते साहेबांच्या पाया पडले आणि ‘साहेब तुम्ही मला वाचविले, त्यामुळे स्वाक्षरी करण्यासाठी हा सोन्याचा पेन घ्या’ असे म्हणाले. साहेबांनी पेन घेतला आणि बाजूला ठेवून दिला. ते उद्योजक तेथून निघून गेल्यावर साहेबांनी पेन घेतला. त्यावेळी विद्यार्थी शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी आले होते. त्यातील एका विद्यार्थ्याच्या हातात तो पेन देऊन टाकला असे गोरूले यांनी सांगितले. दिघे साहेबांना कसला मोह नव्हता. परंतु त्यांच्यासमोर तुम्ही पैसे उधळता? लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना अशी टीका त्यांनी केली.