अंबरनाथ : गेल्या काही वर्षांत वेगाने विस्तारलेल्या अंबरनाथ शहराच्या पाले भागात जलकुंभ उभारूनही जलवाहिन्या टाकण्यात येणाऱ्या अडचणी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रखडलेली जोडणी यामुळे सुमारे पाच ते सहा हजार लोकसंख्येला टँकर आणि कूपनलिकांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. अखेर या भागासाठी दोन दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाले असून त्यासाठी तीन इंच व्यासाची जोडणीही देण्यात आली आहे. त्यामुळे पाले गावाचा पाणीप्रश्न अखेर सुटला आहे. चाचण्या आणि आवश्यक दुरुस्ती कामानंतर येथे पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.
अंबरनाथ शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर वाढली असून चिखलोली पाले हे नवे परिसर निर्माण झाले आहेत. मात्र शहराच्या या विस्तारीत भागात रस्ते, पाणी यासारख्या पायाभूत सुविधा उभारण्यात उशिर झाला. काही महिन्यांपूर्वी येथील रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. तर पाले भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पाणीपुरवठा अद्याप सुरू झाला नव्हता.
येथील बांधकाम व्यावसायिकांनी जलकुंभ उभारण्यासाठी प्राधिकरणाला जागा देऊ केली होती. अमृत योजनेतून जलकुंभाची उभारणी चार वर्षांपूर्वीच झाली. मात्र स्थानिकांनी विरोध केल्याने जलकुंभापर्यंत जलवाहिन्या टाकण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. परिणामी येथे राहण्यास आलेल्या सुमारे पाच ते सहा हजार नागरिकांना टँकर आणि कूपनलिकांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. त्याचा भुर्दंड बांधकाम व्यावसायिकांना पडत होता.
याबाबत ‘लोकसत्ता ठाणे’मधून सातत्याने वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. स्थानिकांच्या विरोधामुळे रखडलेल्या जलवाहिन्यांच्या कामाचे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेले होते. काम रखडत असल्याने प्राधिकरणाने जलवाहिन्यांचा मार्ग बदलला. त्यासाठी जुन्या जलवाहिन्या काढण्याचे मोठे दिव्य प्राधिकरणापुढे होते. मार्ग बदलून जलवाहिन्या टाकण्याचे काम डिसेंबर २०२१ मध्ये सुरू करण्यात आले.
जलवाहिन्या टाकल्या गेल्या असल्या तरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अद्याप जलवाहिनीतून जोडणी मिळाली नव्हती. त्यासाठी प्राधिकरणाने ९७ लाख रुपयांची थकबाकी एमआयडीसीला अदा केली. स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाने अखेर बारवीच्या गुरूत्ववाहिनीवर नुकतीच तीन इंचाची जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे पाले भागाला पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
फणसीपाडय़ालाही जलदिलासा
फणसीपाडा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या मागणीनंतर एमआयडीसीने मुख्य जलवाहिनीतून निघालेल्या सहा इंचाच्या जलवाहिनीतून फणसीपाडय़ाला नवी जोडणी देण्यात आली आहे. त्यापूर्वी फणसीपाडय़ातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. आठवडाभरात येथील पाणीपुरवठा सुरू होईल.
जोडणी मिळाल्यानंतर आता टाकलेल्या जलवाहिन्यांमधून पाणी प्रवाहित करून तपासणी केली जाणार आहे. आवश्यक तेथे दुरुस्ती करून येत्या १५ दिवसांत थेट गृहसंकुलांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. जलकुंभाखाली भूमिगत जलकुंभ उभारून त्याचा वापर केला जाईल.- मिलिंग बसनगार, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अंबरनाथ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा