पाणी पुरवठ्यातील अनियमितता आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे अनेक पाणी ग्राहकांनी बिल भरणा करण्याकडे पाठ फिरवली. परिणामी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी तब्बल १६१ कोटींवर पोहोचली आहे. त्यामुळे प्राधिकरणाने अभय योजना लागू केली होती. मात्र त्यातही अवघे ११ कोटी २९ लाखांचीच वसूल झाल्याने जीवन प्राधिकरणाने अभय योजनेला मुदतवाढ दिली असून जानेवारी २०२३ पर्यंत थकबाकी भरता येणार आहे

अंबरनाथ आणि बदलापूर या मुंबई महानगर प्रदेशातील अ वर्ग नगरपालिकांच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी राज्य शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. जीवन प्राधिकरण उल्हास नदीवर असलेल्या बॅरेज बंधाऱ्यातून पाणी उचलून ते अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पुरवठा करते. बदलापूर शहराचा पूर्ण पाणी पुरवठा बॅरेज बंधाऱ्यावर तर अंबरनाथ शहरात एमआयडीसी आणि चिखलोली धरणावरही अवलंबून आहे. पाण्याची उपलब्धता पुरेशी असली तरी विविध कारणांमुळे पाणी पुरवठअयात अडचणी येतात. त्यामुळे काही ठिकाणी बारमाही तर काही ठिकाणी अनेकदा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो. परिणामी ग्राहक बिलाचा भरणा करण्याकडे पाठ फिरवत असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी तब्बल १६१ कोटींपर्यंत पोहोचली आहे.

एकीकडे पाण्याची होणारी तुट, चोरी आणि बिलाचा कमी झालेला भरणा यामुळे प्राधिकरणाला आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यामुळे बेकायदा जोडणी अधिकृत करून आणि थकबाकी वसूल करून आर्थिक समतोल साधण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी प्राधिकरणाने अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील ग्राहकांसाठी अभय योजना लागू केली होती. मात्र त्यानंतरही अवघी ११ कोटी २९ लाख रूपयांची वसूली झाल्याची माहिती अंबरनाथच्या जीवन प्राधिकरणा कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्राधिकरणाची मुळ थकबाकी ९४ कोटी १९ लाख आणि व्याजाची थकबाकी ६६ कोटी ८२ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यात ३ हजार ४ ग्राहकांनी थकबाकी भरली आहे. त्यामुळे अजूनही १६१ कोटींची थकबाकी असल्याने आता प्राधिकरणाने अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या जानेवारी २०२३ पर्यंत ही अभय योजना लागू असले. यात सप्टेंबर महिन्या अखेरपर्यंत संपूर्ण थकबाकी भरल्यास ग्राहकांचे सर्व व्याज माफ केले जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केले जाते आहे.

Story img Loader