ठाणे : महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांसाठी प्रशासनाने पावसाळ्याच्या दोन महिने आधीच म्हणजेच मार्च महिन्यात निविदा काढल्या आहेत. नऊपैकी पाच प्रभाग समितीच्या निविदा मजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्या तरी उर्वरित चार प्रभाग समितीच्या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे दोन समितीत दुसऱ्यांदा तर दोन समितीत तिसऱ्यांदा निविदेला मुदतवाढ देण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे.

पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेकडून यंदाही नालेसफाईची कामे करण्याची तयारी मार्च महिन्यातच सुरू झाली होती. या कामांसाठी पालिका १० कोटी २९ लाख रुपये खर्च करणार आहे. याशिवाय, पावसाच्या पाण्याच्या मार्गातील अडथळे दूर उड्डाणपुलाखालील गटारांबरोबरच निमुळत्या नाल्याची रुंदी वाढविण्यासाठी तेथील अडथळे आणि भराव काढून टाकणे, अशी कामेही करण्यात येणार आहेत. नालेसफाई कामासाठी पालिकेने प्रभाग समितीनिहाय नालेसफाईच्या कामांच्या निविदा काढून २५ मार्चपर्यंत कामाचे कार्यादेश देण्याचे नियोजन आखले होते. मात्र, एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी या कामांचे कार्यादेश देण्यात आलेले नाहीत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नौपाडा-कोपरी, उथळसर, माजीवडा-मानपाडा, कळवा, दिवा या पाच प्रभाग समिती क्षेत्रातील निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. तर, लोकमान्य-सावरकरनगर, वागळे, मुंब्रा आणि वर्तकनगर या प्रभाग समिती क्षेत्रातील निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही. लोकमान्य-सावरकरनगर, वागळे या दोन समितीत दुसऱ्यांदा तर मुंब्रा आणि वर्तकनगर या दोन समितीत तिसऱ्यांदा निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

महापालिका पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाईची कामे करून घेते. ही कामे ३१ मेपुर्वी पुर्ण होणे अपेक्षित असते. मात्र, निविदा प्रक्रीया उरकून एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरूवात होते. यामुळे ३१ मे पर्यंतच्या मुदतीत ही कामे पुर्ण होत नाहीत. पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाईची कामे सुरूच असतात. यावरून पालिका प्रशानावर टिका होत असते. हि बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने यंदा मार्च महिन्यातच नालेसफाईच्या कामांसाठी निविदा काढल्या आहेत.

नाल्यांची आकडेवारी

प्रभाग समिती – नाल्यांची संख्या

कळवा – २०१

दिवा – १३१

नौपाडा- ४९

वागळे इस्टेट- ३८

लोकमान्य-सावरकरनगर – ३४

उथळसर – ४

वर्तकनगर – २९

माजीवाडा- मानपाडा – ४४

मुंब्रा – ८०