डोंबिवली: डोंबिवली शहरातील एका विकासकाकडे डिसेंबर २०१८ ते जुलै २००२४ या कालावधीत त्यांच्या शहरातील विविध बांधकाम प्रकल्पांविषयी कल्याण डोंबिवली पालिका, शासकीय कार्यालयांमध्ये ती बांधकामे अनधिकृत आहेत म्हणून तक्रारी करून, त्याविषयी समाज माध्यमांमध्ये या प्रकल्पांची माहिती सामायिक करून संबंधित विकासकाची बदनामी करणाऱ्या, तसेच या विकासकाकडून सात वर्षाच्या कालावधीत ४१ लाख रूपये रोख आणि चार सदनिका जबरदस्तीने खंडणी स्वरुपात घेणाऱ्या एक पालिका कर्मचारी, त्याचे तीन साथीदार आणि एका माहिती कार्यकर्त्या विरुध्द खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी खंडणीचा गुन्हा विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल केला.
विनोद मनोहर लकेश्री, प्रशांत शिंदे, विलास शंभरकर, परेश शहा आणि मागील अनेक वर्ष डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांच्या विरुध्द निर्भय बनो संस्थेच्या माध्यमातून आवाज उठविणारे माहिती कार्यकर्ते महेश दत्तात्रय निंबाळकर यांच्या विरुध्द ठाणे येथील खंडणी विरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे यांनी विकासक प्रफुल्ल गोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : Railway Job Scam : रेल्वेत नोकरी देण्याचा बहाणा करून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक
लकेश्री हे कल्याण डोंबिवली पालिकेत वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. ते पालिकेच्या अ प्रभागात घनकचऱ्याच्या वाहनावर कर्तव्यावर आहेत. काही महिन्यापूर्वी त्यांच्यावर पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाबाहेर भूमाफियांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले होते. डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथील बांधकाम गृहप्रकल्पात हा प्रकार २०१८ ते २०२४ या कालावधीत घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले, डोंबिवलीतील विकासक प्रफुल्ल मोहन गोरे (४०, रा. रिजन्सी अनंतम, शिळ रस्ता, डोंबिवली) यांचे डोंबिवलीत डिसेंबर २०१८ पासून कुंभारखाणपाडा, देसलेपाडा, कोपर रस्ता, गोग्रासवाडी भागात इमारत बांधकाम प्रकल्प सुरू होते. या कालावधीत आरोपींनी विकासक प्रफुल्ल गोरे यांचे प्रकल्प अनधिकृत आहेत. ते तोडण्यात यावेत म्हणून पालिका कार्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये तक्रारी केल्या. या बांधकामांची छायाचित्रे समाज माध्यमांवर सामायिक करून या गृहप्रकल्पांमध्ये कोणी घर घेऊ नये म्हणून विकासकाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. या गृहप्रकल्पांच्या तक्रारी मागे घेण्यासाठी आरोपींनी तक्रारदार विकासक प्रफुल्ल गोरे यांच्याकडून वेळोवेळी एकूण ४१ लाख रूपये खंडणी स्वरुपात उकळले. तसेच डोंबिवली येथील गृहप्रकल्पातील चार सदनिका खंडणी स्वरुपात जबरदस्तीने बळकावल्या. विकासकाच्या या तक्रारीच्या अनुषंगाने हा गुन्हा खंडणी विरोधी पथकाने दाखल केला आहे. या प्रकरणातील लकेश्री आणि त्याचे तीन साथीदार फरार असून खंडणी विरोधी पथक त्यांचा शोध घेत आहे.
हेही वाचा : ठाण्याचे माजी महापौर नईम खान यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
या तक्रारीसंदर्भात निर्भय बनोचे संस्थापक महेश निंबाळकर यांनी सांगितले, आपणास यासंदर्भात काहीही माहिती नाही. आपण डोंबिवलीतील सर्व बेकायदा बांधकामांच्या तक्रारी अनेक वर्ष पालिकेत करत आहोत. त्या विरुध्द आपली उपोषणे सुरू आहेत. या बेकायदा बांधकाम विषयावरून पालिका कारवाई करत नाही म्हणून आपण मागील साडे तीन वर्षापासून उपोषण करत आहोत. कुंभारखाणपाडा येथील बेकायदा गृहप्रकल्पाविषयी आपण आवाज उठविला आहे. आपण बेकायदा बांधकामांच्या विरुध्द आवाज उठवितो म्हणून आपला आवाज दाबण्यासाठी आपणास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा हा प्रयत्न आहे. यासंदर्भात आपण वेळ आली तर चौकशी अधिकाऱ्यांना बेकायदा बांधकामांच्या विरुध्द आपण देत असलेल्या लढ्याविषयी साद्यंत माहिती देऊ.