ठाणे : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांच्याविरोधात खंडणीची तक्रार दाखल करणारा भाजपचा पदाधिकारी असल्याची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारदार हा भाजपचा दिघा येथील पदाधिकारी असून राजकीय सूडामुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे याप्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मनोहर मढवी (एम.के.) यांना ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर ही कारवाई दडपशाहीने सुरू असल्याचा आरोप केला जात होता. दरम्यान, यातील तक्रारदार हा मागील पाच वर्षांपसून क‌ळवा येथे वास्तव्यास आहे. त्याचा दिघा आणि ठाण्यातील कोपरी भागात मिक्सर आणि ग्रायंडर दुरुस्तीचा कारखाना आहे. हा तक्रारदार भाजपचा दिघा येथील दिघा तालुकाध्यक्ष आहे असा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यासंदर्भाचा संदेश एम. के. मढवी यांचे पुत्र करण मढवी यांनी इन्टाग्राम या समाजमाध्यमावर प्रसारित केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.