कल्याण- कल्याण जवळील शहाड येथील उड्डाण पुलाखाली अपंगाचा स्टाॅल लावून तेथे पोळी भाजी विक्री केंद्र चालवून कुटुंबीयांची उपजीविका करणाऱ्या एका अपंगाकडे एका स्थानिकाने दरमहा सहाशे रुपये खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी स्थानिकाने अपंगाला दिल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला आहे.
आम्ही स्थानिक आहोत. अपंगाच्या टपरीवर ट्रक फिरवुन ती जमीनदोस्त करु तेथे पाण्याचा टँकर उभा करुन ठेऊ, असा इशारा स्थानिकाने अपंगाला दिला आहे.सत्यवान पाटील (४१) असे अपंगाचे नाव आहे. ते शहाड उड्डाण पुलाखाली पोळी भाजी केंद्र चालवितात. मंगेश कोट (रा. धाकडे शहाड) आणि एक अनोळखी इसम अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, शुक्रवारी रात्री आरोपी मंगेश कोट शहाड पुलाखाली आपल्या साथीदारासह आला. त्याने सत्यवान यांना ‘तू येथे टपरी लावली आहे. त्याबदल्यात आम्हाला दरमहा ६०० रुपये हप्ता द्यावा लागेल. हप्ता दिला नाहीतर टपरी तोडून तेथे पाण्याचा टँकर उभा करू.’
सत्यवान यांनी हप्ता देण्यास विरोध करताच मंगेश कोट यांनी सत्यवान यांना शिवीगाळ करत ‘तुझा माज तात्काळ उतरवीन आणि तुला जीवे ठार मारुन टाकीन’ अशी धमकी दिली. हप्ता न दिल्यास तुझ्या टपरीचा चुराडा करू, अशी धमकी देऊन मंगेश कोट निघून गेले, अशी तक्रार सत्यवान यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात केली आहे.