निखिल अहिरे
ठाणे : जलजीवन अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एक लाखाहून अधिक नळजोडण्या पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत असले तरी, शहापूर आणि मुरबाड भागांत अजूनही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. येथील ७१ हजार लोकसंख्या असलेल्या १५३ पाडय़ांना गेल्या दोन महिन्यांपासून ३२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळय़ात पाण्याची भीषण टंचाई जाणवते. दरवर्षी जिल्ह्यातील शेकडो टंचाईग्रस्त गावपाडय़ांना प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या वर्षीदेखील जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांतील ४२ टंचाईग्रस्त गावांना मागील दोन ते तीन महिन्यांपासून दररोज टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील २७ आणि मुरबाड तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे.
या टंचाईग्रस्त गावांमध्ये एकूण १५३ पाडय़ांचा समावेश आहे. यापैकी प्रत्येक पाडय़ाची लोकसंख्या ही सुमारे दोनशे ते चारशेच्या घरात असून यांची एकूण लोकसंख्या ही ७१ हजार ७२३ इतकी आहे. या इतक्या मोठय़ा लोकसंख्येला दररोज केवळ ३२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे या पाडय़ातील कुटुंबांना प्रतिदिन जेमतेम काही लिटर पाणी मिळते. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या किती तीव्र आहे हे दिसून येते.
जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना
या पाडय़ांची पाण्याची समस्या सुटावी याकरिता प्रशासनातर्फे जल जीवन अभियान आणि िवधन विहीर यांसारख्या योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात जल जीवन अभियानअंतर्गत आजतागायत ग्रामीण भागात १ लाख ४२ हजार कुटुंबाना वैयक्तिक नळजोडण्या केल्या असल्याचा दावा जिल्हा परिषदेकडून करण्यात आला आहे. यात सुमारे अडीच लाख कुटुंबाना येत्या दोन वर्षांत वैयक्तिक नळजोडणी करण्याचे उद्दिष्टही ठरविण्यात आले आहे. तसेच येत्या काही महिन्यांत प्रशासनाकडून ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी २५२ विंधन विहिरी तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावपाडयांना भावली धरण योजनेंतर्गत येत्या दोन वर्षांत पाणीपुरवठा केला जाणार असून या गावांना टँकरपासून मुक्तता मिळणार आहे. तसेच मुरबाडमध्येदेखील टंचाईग्रस्त भागांसाठी विविध पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. – डॉ. भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे