tv10पूर्वी ठाण्यातील राम मारुती रस्त्यावरून १५ मिनिटांनी एखादी गाडी जात होती. इतके हे रस्ते नीरव आणि शांत होते असे तेथील जुनेजाणते नागरिक सांगतात. मात्र सध्या परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ‘वाहतूक कोंडीमुळे’ राम मारुती रस्ता ओलांडायलाच आता १५ मिनिटे लागतात ही वस्तुस्थिती आहे. वाढणाऱ्या शहरासोबतच ठाणेकर नागरिकांची खासगी वाहने वाढू लागली. सोसायटय़ांमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने बहुतेक वाहने रस्त्यांवर उभी असतात. वाहतूक कोंडीचे तेही एक कारण आहे. गृहसंकुले वाढली, पण अंतर्गत रस्ते तेवढेच राहिले. त्यामुळे ठाणे शहरात सध्या वाहतूक कोंडीचे अनेक जंक्शन्स तयार झाली आहेत.

नितीन कंपनी जंक्शन
ठाण्यातील तीन हात नाका परिसर कायमच वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जातो. तीन ते साडेतीन मिनिटांचा सिग्नल अशी त्याची पूर्वीपासून ओळख आहे. तो टाळण्यासाठी लोकमान्य नगर, सावरकर नगर, इंदिरा नगर आदी भागातील नागरिक तीन हात नाका जंक्शन वगळून नितीन कंपनी जंक्शनमार्गे ठाणे शहरात दाखल होण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यामुळे या भागातील कोंडी वाढू लागली आहे. आठ रस्त्यांची एकमेकांशी गाठ त्या ठिकाणी होते. वाहतुकीचे जंक्शन असूनही कायमस्वरूपी सिग्नल व्यवस्था सुरू न ठेवल्याने आज नितीन कंपनी जंक्शन वाहतूक कोंडीचे प्रमुख ठिकाण आहे. लोकमान्य नगरकडून येणारा मुख्य रस्ता, लुईसवाडी आणि कोरम मॉलकडून येणारे सेवा रस्ते, पूर्व द्रुतगती महामार्ग, पाचपाखाडी भागातील सेवा रस्ते आणि ठाणे महानगरपालिकेकडून येणारा मुख्य रस्ता असे आठ रस्ते नितीन कंपनी जंक्शन भागात एकमेकांशी जोडले जातात आणि तेथे अभूतपूर्व अशा स्वरूपाची वाहतूक कोंडी होते.

आराधना टॉकीज चौक
हरिनिवास चौकाकडून वंदना टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर आराधना टॉकीजच्या चौकात दिवसागणिक वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत आहे. वंदना टॉकीजसमोरील एस. टी. स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडय़ा, ठाणे परिवहन सेवेच्या वागळे आगाराच्या दिशेने जाणाऱ्या बसगाडय़ा, तीन पेट्रोलपंपकडे येणारी खासगी वाहने तसेच सी. एन. जी. पंपावर येणाऱ्या रिक्षा यामुळे संध्याकाळी या चौकात वाहतूक कोंडी होते. वंदना टॉकीजसमोरील रस्त्यावर जरी एकेरी वाहतूक असली तरी त्यापूर्वीच आराधना टॉकीज चौकात गाडय़ांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पाचपाखाडी परिसरात प्रवेश करताना वाहनचालकांच्या नाकी नऊ येतात.

स्ता क्रमांक १६
वागळे इस्टेट परिसरात आयटी पार्क सुरू झाल्याने रस्ता क्रमांक १६ वर वाहनांची वर्दळ वाढली आहे. अहोरात्र सुरूअसणाऱ्या या आयटी पार्कमधील कर्मचाऱ्याची ने-आण करणाऱ्या बस, खासगी गाडय़ा, ठाणे परिवहन सेवेच्या लोकमान्यनगर आगार, पवार नगर, वागळे आगार आदी मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्या बस, बेस्ट उपक्रमाच्या बस, जागोजागी तयार झालेले रिक्षाथांबे यामुळे रस्ता क्रमांक १६ वाहतुकीचे जंक्शन बनला आहे. इथे रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या ट्रक, टेम्पोमुळे वाहतूक कोंडीत भरच पडते. सकाळी गर्दीच्या वेळी जुन्या पासपोर्ट कार्यलयाकडून रस्ता क्रमांक १६ च्या दिशेने येणारी वाहतूक, किसननगर भागातून बाहेर येणाऱ्या गाडय़ा आणि ठाणे परिवहनच्या बस, श्रीनगरकडून ठाणे-मुंबईकडे येणाऱ्या खासगी गाडय़ा आणि ठाणे परिवहनच्या वागळे आगारातून ठाणे शहराकडे धावणाऱ्या गाडय़ा, अंबिकानगरच्या दिशेने तसेच अक्षर आयटी पार्ककडे जाणाऱ्या बस यामुळे या भागात नागरिकांना भयानक वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

वर्तकनगर चौक
पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शनचा सिग्नल पार करून वर्तकनगर, शास्त्रीनगर, शिवाईनगर, येऊरकडे येणाऱ्या वाहतुकीला ‘ब्रेक’ लागतो तो समतानगरसमोरच. कारण वर्तकनगर चौकातील वाहतूक कोंडीचे शेवटचे टोक समतानगर आहे. वर्तकनगर चौकापासून गाडय़ांच्या लांबच लांब रांगा चोहूबाजूनी लागतात. त्याचाच फटका आज वर्तकनगर चौकातील वाहतुकीला बसला आहे. कॅडबरी सिग्नलकडून वर्तकनगरकडे येणारी वाहतूक तसेच वर्तकनगर चौक पार करून शास्त्रीनगर, शिवाईनगरकडे येणाऱ्या गाडय़ा, वेदांत, कोरस, रुणवाल, दोस्ती विहार अशा गृहसंकुलांकडे जाणारा रस्ता, यशोधन नगरकडे जाणारा आतील रस्ता हे सर्व रस्ते वर्तकनगर चौकात एकत्र येतात आणि वाहतूक कोंडी होते.

सावरकर नगर चौक ते कामगार रुग्णालय बसथांबा
अनेक रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याच ठिकाणी वाहतूक कोंडी होते, हा समज सावरकर नगर चौक परिसरात चुकीचा ठरतो. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या खासगी गाडय़ा, रिक्षाथांब्यावर अस्ताव्यस्त स्वरूपात उभ्या असणाऱ्या रिक्षा, गॅरेज, गाडय़ा धुणारी सव्‍‌र्हिस सेंटर यामुळे या भागात काही क्षणांत वाहतूक कोंडी रौद्र रूप धारण करते. सावरकर नगर चौकात भारतरत्न इंदिरा गांधी शाळा आणि महाविद्यालय आहे. शाळा, महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी त्याचबरोबर सुटल्यानंतर या चौकात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागतात. यामुळे यशोधन नगर, महात्मा फुले नगर, इंदिरा नगर, कामगार वसाहत आदी भागांतील अंतर्गत रस्त्यांवर ही वाहतूक कोंडी पसरते. ठाणे परिवहन सेवेचे लोकमान्य नगर आगार येथून हाकेच्या अंतरावर असल्याने तेथून सुटलेल्या बसगाडय़ा या वाहतूक कोंडीत २० ते २५ मिनिटे अडकून पडतात. येथे वाहतूक पोलीस नसल्याने अजूनही त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यावर स्थानिक नागरिक अथवा ठाणे परिवहनच्या वाहकांना रस्त्यावर उतरून वाहतूक पूर्ववत करावी लागते.