रसायने मिसळल्यामुळे जलप्रवाह प्रदूषित होण्याची भीती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय हरित लवाद आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांनी प्रदूषणाबाबत फटकारल्यानंतरही अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील उद्योगांनी मात्र प्रदूषणाच्या बाबत करावयाच्या पूर्ततांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र आणि बदलापूर औद्योगिकक्षेत्रातील अनेक कारखाने आजही रसायनमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया न करता बाहेर सोडत आहेत. या सांडपाण्यातील रसायने जमिनीत मुरून तसेच आसपासच्या जलप्रवाहांत मिसळल्यामुळे मोठय़ा प्रमाणात जलप्रदूषण होण्याची भीती आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकत्याच दिलेल्या एका अहवालात अंबरनाथ, बदलापूर या शहरांतील हवा अतिशय प्रदूषित असल्याचे म्हटले होते. याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या गेलेल्या नसतानाच, आता या शहरांतील जलप्रदूषणही चिंतेचा विषय ठरू लागले आहे. बदलापूर आणि अंबरनाथमधील अनेक कारखान्यांतून बिनदिक्कतपणे रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता कंपनीबाहेर उघडय़ा नाल्यात टाकले जात आहे. तसेच त्यातून निघणारा कचराही रस्त्याशेजारी किंवा मोकळ्या जागेवर फेकलेला दिसून येतो. त्यावेळी कोणतीही प्रक्रिया होत नाही. अनेकदा या रसायनमिश्रित सांडपाण्याचा हवेशी संपर्क येऊन नाल्यांना आग लागण्याचे प्रकारही समोर आले आहेत. या पाश्र्वभूमीवर प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, राष्ट्रीय हरित लवाद आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने यामध्ये वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा त्याचा नागरिकांना त्रास होऊन त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे मत नागरिक सेवा मंडळाचे सत्यजित बर्मन यांनी व्यक्त केले आहे. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर सिटिझन फोरमच्या माध्यमातून वेळोवेळी अशा कारखान्यांबाबत तक्रारी व पुरावे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले जातात. परंतु, तरीही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Factories waste water released on road
Show comments