ठाणे : हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचा दर्शन पूर्ण होत नाही, तसेच छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन हे आपल्याला कधीच फळणार नाही, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीतील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भिवंडीत पहिल्या शिव मंदिराचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर कशासाठी तर ते यासाठी हवे होते की, आज आपण आपल्या इष्ट देवतेच्या मंदिरात जाऊन इष्टदेवतेची साधना करू शकतो याचे एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी देव देश आणि धर्माची लढाई जिंकली म्हणून तुम्ही आणि आम्ही हिंदू आहोत आणि आपल्या देवतेचा दर्शन करू शकतो, असेही ते म्हणाले.

हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचा दर्शन पूर्ण होत नाही, तसेच छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन हे आपल्याला कधीच फळणार नाही. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे मंदिर या ठिकाणी बांधण्याचा जो निर्णय घेण्यात आला, त्याबद्दल शिवक्रांती प्रतिष्ठानचे राजू चौधरी यांचा मनापासून आभार मानतो आणि तुम्ही हे जे काम केले आहे, या कामाकरीता, तुमच्या या मेहनती करीता तुमच्या समोर नतमस्तक होतो, असेही ते म्हणाले. अतिशय सुंदर अशा प्रकारचे मंदिर उभारले आहे.

केवळ मंदिर नाही तर त्याला सुंदर तटबंदी आहे. अतिशय चांगले बुरुज, त्या ठिकाणी आहे. दर्शनीय अशा प्रकारचा प्रवेशाचा मार्ग आणि बगीच्याची जागा त्या ठिकाणी आहे. शिवरायांच्या जीवनातले सगळे प्रसंग देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, असेही ते म्हणाले. अतिशय सुंदर शिवरायांच्या जन्मापासून तर राज्याभिषेकापर्यंत आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळी वाघाचा जबडा फोडला होता, त्या प्रसंगापर्यंतचे सर्व प्रसंग हे आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात.

छत्रपती शिवरायांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि राजमाता जिजाऊ मासाहेब देखील आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे राष्ट्र मंदिर असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही, असेही ते म्हणाले. राष्ट्र मंदिर या ठिकाणी निर्माण झालेले आहे की, त्यातून एक मोठी प्रेरणा ही आपल्या सगळ्यांना मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader