कल्याण- सवलतीचे प्रलोभन, उंची भेटवस्तु, पर्यटनाच्या प्रलोभानापायी काही घाऊक औषध, किरकोळ औषध विक्रेते कल्याण शहरात टेल्मा एम या बनावट रक्तदाबाच्या गोळ्यांची विक्री करत असल्याचे या गोळ्यांच्या उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आले होते. या अधिकाऱ्यांनी खात्री पटल्यावर यासंबंधी पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाला ही माहिती दिली. त्याप्रमाणे या यंत्रणांनी कल्याणमधून एक लाख १५ हजार रुपये किमतीचा रक्तदाब गोळ्यांचा बनावट साठा जप्त केला.
या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त नि. पा. आहेर यांनी कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवरील हिलकोर हेल्थकेअर या कंपनीला औषध खरेदी विक्री त्वरित थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा >>> हळदी कुंकूच्या नावाने स्कूटी, सोन्याची अंगठी अन् वस्तुंची खैरात, पालिका निवडणुकांसाठी उमेदवार पुन्हा तयारीला!
कल्याणमधील काही औषध विक्रेते टेल्मा ४० एमजी, टेल्मा एच या रक्तदाबावरील गोळ्यांची नामसाधर्म्य असलेली बनावट औषधे विकत असल्याचे उत्पादक कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी राकेश सावंत यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लाल चौकी येथील राॅयल मेडिकल दुकानातून ही औषध खरेदी केली. त्या औषधांवरील व्यापार चिन्हाचा संशय सावंत यांना आला. त्यांनी ती कंपनीच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविली. त्यावेळी व्यापारचिन्हाचा गैरवापर करुन बनावट औषधे तयार करण्यात आली आहेत असे निदर्शनास आले. अशाच पध्दतीने कासारहट मधील द्रृष्टी एन्टरप्रायझेस या ठिकाणीही बनावट औषध विक्री केली जात असल्याचे सावंत यांच्या निदर्शनास आले. या दोन्ही विक्रेत्यांकडून एक लाख ४० हजार रुपये किमतीचा बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे, असे बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. या दोन्ही विक्रेत्यांविरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> “पक्षावर दबाव आणण्यासाठी कट…”, नरेश मस्केंचा राजन विचारेंवर गंभीर आरोप
या बनावट साठ्यासंदर्भात पोलिसांनी पुरवठादार अशोक गंगवाणी यांना विचारणा केली. त्यांनी आपण हा साठा गुजरातमधील अहमदाबाद येथील विराम मेडिकल एजन्सीमधून आणला आहे. आपण स्वता उत्पादन करत नाही, असे सांगितले. ग्लेनमार्क कंपनीच्या औषध गोळ्यांच्या नाव साधर्म्याची औषधे बनावट मार्गाने बाजारात आणून त्यांच्या विरुध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी कंपनी अधिकाऱ्याने केली आहे. औषधे सवलतीच्या दरात घेऊन काही प्रलोभने पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न काही औषध खरेदी विक्री करणारे करत आहेत. आरोग्य व्यवस्था धोक्यात आणण्याचा हा प्रकार आहे. घाऊक विक्रेत्यांनी औषधे खरेदी करताना राज्यातील अधिकृत औषध विक्रेता एजन्सीकडून खरेदी करावीत, असे आवाहन अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केली आहे. किरकोळ औषध विक्रेत्यांनी औषधे खरेदी करताना खबरदारी घेण्याची दक्षता बाळगावी, असे शिंदे यांनी सांगितले.