कल्याण – महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल अखेरपर्यंत वाहन चालकांनी ही उच्च सुरक्षा नोंदणीची पाटी बसवून घ्यायची आहे. अन्यथा वाहन मालकांना दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या निर्णयाचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी उच्च सुरक्षा नोंदणी वाहन क्रमांकाच्या बनावट जुळण्या (लिंक) तयार करून त्या माध्यमातून वाहन मालक, चालकांची फसवणूक सुरू केली आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची पाटी वाहनांवर बसविण्यासाठी शासनाने परिवहन विभागाच्या अंतर्गत राज्याच्या विविध भागात खासगी एजन्सी नियुक्त केल्या आहेत. या एजन्सीच्या माध्यमातून वाहन मालकांनी आपल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी वाहन क्रमांकाची पाटी (एचएसआरपी) बसून घ्यायची आहे. राज्याच्या परिवहन विभागाच्या ट्रान्सपोर्ट.महाराष्ट्र.गव्ह.इन या संकेतस्थळावर किंवा एचएसआरपी आनलाईन बुकिंग या जुळणीच्या माध्यमातून वाहन मालकांना आपल्या वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवून घेण्याची सुविधा परिवहन विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

शहर, जिल्हा, तालुका स्तरावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या कामावर नियंत्रण ठेऊन आहेत. मुंबईत उच्च सुरक्षा नोंदणी वाहन पाटी बसविण्याचे काम करणाऱ्या मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड, मे. रिअल मेझाॅन इंडिया या कंपनीकडून राज्याच्या परिवहन विभागाला ईमेल माध्यमातून उच्च सुरक्षा नोंदणी वाहन पाटी बसविणाऱ्या काही बनावट जुळण्या सायबर गुन्हेगारांनी तयार केल्या आहेत, असे निदर्शनास आणले. अशाप्रकारच्या सहा बनावट जुळण्या ऑनलाईन माध्यमातून सक्रिय असल्याचे निदर्शनास आल्यावर राज्याच्या परिवहन विभागाचे साहाय्यक परिवहन आयुक्त गजानन ठोंबरे यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुध्द तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.बुकमायएचएसएसपी, बुक्डमायएचएसआरपी, बुकमीएचएसआरपी, बुकिंगमायएचएसआरपी, इंडनंबरप्लेट, एचएसआरपीआरटीओ या बनावट जुळण्या असल्याची माहिती परिवहन विभागाने सायबर पोलीस ठाण्याला दिली आहे.

वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, वाहन क्रमांक पाटीमध्ये होणारी छेडाछेड, गुन्हा करून पळणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, अशा अनेक कारणांमुळे सर्वोच्च न्यायालयाने वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी वाहन पाटी बसविण्याचे आदेश दिले आहेत. ही मुदत ३१ मार्चपर्यंत होती. ही मुदत एक महिना वाढविण्यात आली आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यासाठी परिवहन विभागाने अधिकृत एजन्सी नेमल्या आहेत. तरीही सायबर गुन्हेगारांनी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यासाठी बनावट जुळण्या (लिंक) तयार केल्या आहेत. वाहन मालकांनी अशा बनावट जुळण्यांपासून सावध राहावे. – गजानन ठोंबरे, साहाय्यक परिवहन आयुक्त, परिवहन विभाग.

Story img Loader