कल्याण – डोंबिवलीतील महाराष्ट्रनगरमधील विनोद बिल्डर्सचे मालक विनोद किसन म्हात्रे, जमीन मालक रमेश कचरू म्हात्रे यांना येथील भूमि अभिलेख कार्यालयातून जमिनीचा बनावट मोजणी नकाशा दिला गेला असल्याचे बाजारपेठ पोलिसांंच्या चौकशीत उघडकीला आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आपली चौकशीची दिशा भूमि अभिलेख विभागाकडे वळविली आहे.
डोंबिवलीतील महाराष्ट्रनगरमधील कांचनवाडीतील विनोद बिल्डर्सचे विनोद किसन म्हात्रे, जमीन मालक रमेश कचरू म्हात्रे आणि वास्तुविशारद धीरज पाटील यांनी कल्याणच्या भूमि अभिलेख विभागातून बनावट मोजणी नकाशा मिळविला. या बनावट मोजणी नकाशात सहा गुंठे गुरचरण जमीन जमीन मालकाच्या नावाने मोजणी नकाशात दाखविण्यात आली. या बनावट मोजणी नकाशावर भूमि अभिलेख विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांचे शिक्क, स्वाक्षरी करण्यात आली होती. या बनावट मोजणी नकाशाच्या आधारे कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगरचना विभागाने विनोद बिल्डर्सचा इमारत बांधकाम आराखडा मंजूर केला होता.
हेही वाचा – भिवंडी महापालिकेच्या शिक्षकांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज, शिक्षकांचे निलंबन
या बनावट मोजणी नकाशा प्रकरणात बाजारपेठ पोलिसांनी पंधरा दिवसापूर्वी नगररचना विभागातील भूमापक, आरेखक यांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी भूमि अभिलेख विभागात चौकशी केली होती. त्या चौकशीत पोलिसांंना बनावट मोजणी नकाशा हा भूमि अभिलेख विभागातच तयार करण्यात आल्याचे, तेथील शिक्के, स्वाक्षरी यांचा कौशल्याने वापर केला असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भातची आवश्यक कागदपत्रे पोलिसांनी भूमी अभिलेख विभागातून चौकशीसाठी ताब्यात घेतली आहेत.
या इमारतीचा आराखडा मंजूर करणारे तत्कालीन नगररचनाकार राजेश मोरे, ज्ञानेश्वर आडके यांची नावे पोलिसांकडून घेतली जात होती. परंतु, त्यांनी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला आहे. या प्रकरणातील विनोद म्हात्रे, धीरज पाटील हे न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केल्याने पोलीस अटकेपासून बाहेर आहेत. या प्रकरणाशी संबंधित नगररचनाकार, साहाय्यक संचालक यांच्यावर पोलीस कधी कारवाई करणार, असे प्रश्न आता कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा – कल्याणमध्ये बेकायदा फलकांवर कारवाई, विद्रुपीकरणाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा
महिला लिपिकाला तंबी
डोंबिवलीतील जमीन मालक रमेश कचरू म्हात्रे यांनी पंधरा वर्षापूर्वी कल्याण भूमि अभिलेख कार्यालयातून जमीन मोजणी संदर्भात मिळविलेला नकाशा हा सदोष असल्याचे पत्र दोन वर्षांपूर्वी भूमि अभिलेख विभागाचे तत्कालीन उप अधीक्षक संंग्राम जोगदंड यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाच्या साहाय्यक संचालक यांना पाठवले होते. या नकाशा संदर्भात इमारत बांधकाम आराखडा मंजुरीसाठी कार्यवाही न करण्याचे सूचित केले होते. हा मोजणी नकाशा मूळ गाव नकाशाशी मिळता जुळता नसल्याने तत्कालीन उप अधीक्षक जोगदंड यांनी कल्याण भूमि अभिलेख कार्यालयातील हा मोजणी नकाश तयार करणाऱ्या लिपिक सुमेधावती म. देऊळकर यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम १९७९ अन्वये कारवाई केली होती. त्यामुळे बनावट मोजणी नकाशावरून लिपिक सुमेधावती पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चर्चा आहे. अधिक माहितीसाठी तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना संपर्क केला, त्यांनी आपली बदली झाल्याचे सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने मात्र पालिका, भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांची चौकशी सुरूच राहणार असल्याचे सांंगितले.