येथील घोडबंदर परिसरात तब्बल आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट – पाचच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी पालघर येथे राहणाऱ्या राम हरी शर्मा (५२) आणि राजेंद्र राऊत (५८) या दोघांना अटक केली आहे. तसेच यातील त्यांचा साथीदार आरोपी मदन चौहान आणि इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
हेही वाचा- मीरा भाईंदर नाट्यगृहातील पहिला प्रयोग रद्द; नाट्यगृहात त्रुटी असल्याचा निर्मात्यांचा आरोप
घोडबंदर येथील गायमुख चौपाटी परिसरात काही जण एका कारमधून बनावट नोटांची वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. गुप्तचरांकडून मिळालेल्या या माहितीनुसार पोलिसांनी गायमुख चौपाटी परिसरातील माउली उपाहारगृहाजवळ दोन जण घेऊन जात असलेल्या इन्व्होवा एमएच ०४ डीबी ५४११ या गाडीची तपासणी केली. या तपासणी दरम्यान पोलिसांना गाडीमध्ये भारतीय चलनातील दोन हजार रुपयांच्या नोटांचे ४०० बंडल आढळून आले. या नोटांची पाहणी केली असता सर्व नोटा बनावट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पाहा व्हिडीओ –
या प्रकरणी पोलिसांनी राम हरी शर्मा आणि राजेंद्र राऊत या दोघांना बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी पालघर येथील रहिवासी आहे. तर यांचा साथीदार असलेला मोहन चौहान आणि इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तसेच इतक्या मोठया प्रमाणात बनावट नोटा कुठे छापण्यात आल्या ? त्याच्या उपयोग नेमका कशासाठी आणि कुठे होणार होता ? यामागे कोणी इतर कोणी मुख्य सूत्रधार आहे का ? याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.