ठाणे येथील आनंद टॉकीज परिसरात मंगळवारी बनावट नोटा साथीदारांना देण्यासाठी आलेल्या जॉन्सन थॉमस (३९) याला ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले असून त्याच्याकडून भारतीय चलनातील एक लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, नऊ वर्षांपूर्वी थॉमसला बनावट नोटा प्रकरणात केरळ पोलिसांनी अटक केली होती.
केरळ राज्यातील एका गुन्हेगारी टोळीचा जॉन्सन थॉमस (३९) सदस्य असून ही टोळी भारतीय चलनातील बनावट नोटांच्या व्यवसायात सक्रिय आहे. ठाणे परिसरात बनावट नोटांच्या व्यवसायात सक्रिय असलेल्या काही व्यक्ती या टोळीच्या संपर्कात होत्या. या साथीदारांना बनावट नोटा देण्यासाठी जॉन्सन ठाण्यात येणार असल्याची माहिती ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या पथकाने मंगळवारी आनंद टॉकीज भागात सापळा रचून जॉन्सनला अटक केली. त्याच्याकडून एक लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून त्यामध्ये पाचशे रुपये दराच्या दोनशे नोटांचा समावेश होता. यापूर्वी २००६ मध्ये अशाच गुन्’ाात जॉन्सनला केरळ पोलिसांनी अटक केली होती. ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या चार महिन्यात अशा गुन्’ाात सक्रिय असलेल्या तीन व्यक्तींविरुद्ध अनुक्रमे नौपाडा, शीळ डायघर आणि कोपरी या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्’ाात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चार लाख ९३ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

Story img Loader