कल्याण – कल्याण पूर्वेतील मेट्रो माॅलजवळ एका फेरीवाल्याला गुरुवारी दुपारी लुटून त्याची मोटारसायकल घेऊन तोतया पोलिसांनी पळ काढला होता. कोळसेवाडी पोलिसांनी तातडीने याप्रकरणाचा तपास सुरू करून या प्रकरणातील तोतया पोलिसाला रात्रीच अटक केली आहे. दिलीप शांताराम पाटील (३७, रा. टिटवी, ता. पारोळा, जि. जळगाव) असे अटक तोतया पोलिसाचे नाव आहे.
नेतिवली सूचकनाका येथे राहणारा इंद्रजित गुप्ता (२७) हा फेरीवाल्याचा व्यवसाय करून मिळालेले पैसे खिशात ठेऊन गुरुवारी दुपारी घरी दुचाकीवरून चालला होता. मेट्रो माॅल रिक्षा स्थानक येथे आला असता त्याला दुचाकीवरील दोन जणांनी थांबविले. ‘आम्ही पोलीस आहोत. तुझा वाहन परवाना दाखव, तुला अकराशे रुपये दंड भरावा लागेल, असे बोलून इंद्रजितच्या दुचाकीचा एकाने ताबा घेतला. इंद्रजितला पाठीमागे बसण्यास सांगितले. आपण पोलीस चौकीला चाललो आहोत, असा देखावा तोतया पोलिसांनी उभा केला. चक्कीनाका लाकडाच्या वखारीजवळ दुचाकी जाताच तोतया पोलिसाने इंद्रजितला दुचाकीवरून खाली उतरवले. काही क्षणात तो इंद्रजित समोरून त्याची दुचाकी सुसाट वेगाने घेऊन पळून गेला. त्याच्या सोबतचा दुसरा दुचाकी स्वार अगोदरच फरार झाला.
आपली पोलिसाने नव्हे तर एका तोतयाकडून फसवणूक झाली आहे म्हणून इंद्रजितने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, दिनकर पगारे यांच्या पथकाने तातडीने नेतिवली, मेट्रो माॅल भागातील सीसीटीव्ही चित्रकरण तपासून आरोपीची ओळख पटवली. त्याला कल्याण परिसरातून रात्रीच अटक केली. फेरीवाल्याची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाचे नाव दिलीप शांताराम पाटील (३७, रा. टिटवी, ता. पारोळा, जि. जळगाव) आहे. त्याला चोरीच्या दुचाकीसह पोलिसांनी अटक केली आहे. दिलीपने असे गुन्हे यापूर्वी केले आहेत का, याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे करत आहेत.