जयेश सामंत-भगवान मंडलिक
ठाणे : गृहखरेदीदारांची फसवणूक रोखण्यासाठी अस्तित्वात आलेल्या ‘रेरा’ कायद्याच्या अंमलबजावणीतील अनेक घोळ पुढे येत असतानाच मुंबई महानगर प्रदेशात ‘महारेरा’च्या बनावट नोंदणीचे पेव फुटल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. बेसुमार पद्धतीने सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांसाठी बनावट नोंदणी दाखविली जात असल्याने ग्राहकांची लूट सुरूच असल्याचे चित्र आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मानपाडा, रामनगर या दोन पोलीस ठाण्यात या प्रकरणी ६५ गृह प्रकल्पांवर गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील कळवा, मुंब्रा, दिवा, कल्याण, डोंबिवलीलगत असलेली २७ गावे तसेच भिवंडीलगत असलेल्या खारबाव, मिठगावसारख्या पट्टयात उभ्या रहाणाऱ्या काही बेकायदा इमारतींना ‘महारेरा’चे बनावट क्रमांक आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बेसुमार पद्धतीने बेकायदा बांधकामे सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद आल्यानंतर या बांधकामांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र दिवा, डोंबिवलीलगत असलेली २७ गावे तसेच कळव्यासारख्या भागात पाच ते सात महिन्यांत इमारती उभ्या रहात असल्याचे धक्कादायक प्रकार सुरू आहेत. बांधकामांना रोखण्यात स्थानिक स्वराज्य संस्था अपयशी ठरत असतानाच ‘महारेरा’चे बनावट नोंदणी क्रमांक मिळवून त्याद्वारे घरांची विक्री होत असल्याने ग्राहक राजरोसपणे नाडले जात आहेत. ‘महारेरा’ नोंदणीकृत अधिकृत गृहप्रकल्पात ३५० ते ८०० चौरस फुट घरांच्या किमती अंदाजे ५० लाख रुपयांपासून सुरू होतात. याच अधिकृत गृहप्रकल्पांपासून हाकेच्या अंतरावर होत असलेल्या बेकायदा प्रकल्पांमध्ये तुलनेने स्वस्त घरांची विक्री करताना ‘महारेरा’ची बनावट नोंदणी प्रमाणपत्र पुढे केली जात आहेत.
हिमनगाचे टोक?
‘महारेरा’चे बनावट नोंदणी क्रमांक वापरून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ६५ बेकायदा इमारती उभारण्यात आल्याची जनहित याचिका मध्यंतरी वास्तुविशारद संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेची दखल घेऊन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी नगररचना विभागाकडून तपासणी सुरू केली. तपासणीत या सर्व इमारतींना ‘महारेरा’चे बनावट नोंदणी क्रमांक आढळून आले. त्यानंतर रामनगर, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या केवळ ६५ इमारतींमध्ये हा प्रकार आढळून आला असला तरी ठाणे, कळवा, २७ गाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे बनावट प्रमाणपत्रांची संख्या कितीतरी अधिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
‘महारेरा’ची सावधगिरी
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ‘महारेरा’ने ठाणे आणि आसपासच्या भागातील बांधकामांना नोंदणी प्रमाणपत्र देताना सावधगिरी बाळगत असल्याचे काही विकासकांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले. ‘महारेरा’कडे ऑनलाईन माध्यमातून बांधकाम मंजुरीची कागदपत्रे जमा केल्यानंतर तीन दिवसांत नोंदणी प्रमाणपत्र, क्रमांक मिळत असे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही प्रक्रिया वेळकाढूपणाची होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भूमाफियांच्या लबाडीचा फटका अधिकृत विकासकांनाही बसत असून यानंतरही बेकायदा बांधकामे आणि बोगस नोंदणीचे पेव काही थांबले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. काटेकोर प्रक्रियेमुळे विकासकांना नोंदणी क्रमांकासाठी मागील सात महिन्यांपासून फेऱ्या माराव्या लागत आहेत. महारेरा कार्यालयात मनुष्यबळ पुरेसे नसल्याने तेथे नियमित जाऊनही उपयोग नसतो. तेथे उत्तरे देण्यासाठी कोणीही अधिकारी नसतो. प्राधिकरणाच्या संबंधित सदस्य, पदाधिकाऱ्याला संपर्क केला तर ते प्रतिसाद देत नाहीत, अशा विकासकांच्या तक्रारी आहेत. यासंबंधी ‘महारेरा’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही जनसंपर्क विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही.
दरम्यान, महापालिकेच्या बांधकाम मंजुरीची बनावट कागदपत्रेही भूमाफियांनी तयार केल्याचे निदर्शनास आल्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासयंत्रणांना पालिका सर्व सहकार्य करत आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्याने दिली. ठाण्यातही अशाप्रकारे बनावट बांधकाम परवानग्या आणि महारेराचे नोंदणी क्रमांक आढळून आल्याने महापालिकेच्या नगरविकास विभागाने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.
दोन ठिकाणे एकच क्रमांक ! डोंबिवलीत कुंभारखाणपाडा येथे हरितपट्टय़ात ‘शिव सावली’ हा १० इमारतींमधील २५०पेक्षा जास्त सदनिकांचा गृहप्रकल्प मे. आदित्य इन्फ्राचे प्रफुल्ल गोरे, आदेश बिल्डर्सचे सिध्देश कीर, सिकंदर नंदयाल, कुलदीप चोप्रा, निर्माण होम्सचे मनोज भोईर यांनी उभारला आहे. प्रकल्पाला ‘महारेरा’चा बनावट नोंदणी क्रमांक वापरण्यात आल्यानंतर गोरे यांना नोटीस बजावण्यात आली. हाच क्रमांक २७ गावांतील आदेश बिल्डर्सच्या गृहप्रकल्पासाठीही वापरण्यात आला आहे. एक नोंदणी क्रमांक अनेक बेकायदा इमारतींना लागू करून ग्राहकांची फसवणूक करणारी एक मोठी टोळी डोंबिवली, कल्याण, ठाणे भागात सक्रिय असल्याचे सांगितले जाते. दस्त नोंदणी विभागातील काही अधिकारी या व्यवहारात सामील असल्याच्या तक्रारी आहेत.
महारेराचे बनावट नोंदणी क्रमांक एका गृहप्रकल्पाला असल्याचे गेल्या वर्षी समजले. या विषयीचा पाठपुरावा केल्यानंतर डोंबिवलीतील ६५ इमारतींचा घोटाळा उघडकीला आला. हे प्रकरण न्यायालयात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपासाचा वेग मात्र तितकासा नाही.