उल्हासनगरः एका नामांकीत मसाले कंपनीच्या नावाखाली बनावट मसाले विक्रीचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे. याप्रकरणी नामांकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांच्या मदतीने उल्हासनगरातील खेमानी परिसरात धाड टाकली असता हा प्रकार समोर आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपींचा यात समावेश आहे. हे मसाले कुठून येतात याचा तपास आता पोलीस करत आहेत.

एकेकाळी नामांकीत कंपनीच्या वस्तूची अस्सल बनावट वस्तू बनवण्यासाठी उल्हासनगर शहर प्रसिद्ध होते. कमीत कमी किमतीत हुबेहुब वाटाव्या अशा वस्तू उल्हासनगर शहरात बनवल्या जात होत्या. त्या वस्तूंची मोठी बाजारपेठ उल्हासनगर शहरात उभी राहिली. त्यामुळे राज्यभरातून येथे ग्राहक आणि व्यापारी वस्तू घेण्यासाठी येत होते. मात्र कालांतराने बौद्धीक संपदा हक्काच्या कायद्यान्वये कारवाई केली जात असल्याने असे प्रकार शहरात कमी झाले होते. पुढे उल्हासनगर शहरातील उद्योजकांनी नामांकीत कंपनीच्या नावात एखादा शब्द समाविष्ट करून किंवा काढून त्यासारखे नाव बनवून वस्तू विकण्याचा प्रयोग केला.

आजही शहरात अनेक लहान मोठ्या उद्योगांमध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दर्जेदार वस्तूंची निर्मिती केली जाते आहे. आज शहरात अनेक ब्रँडची दुकाने सुरू झाली आहेत. मात्र तरीही लपूनछपून काही उद्योजक दुसऱ्या कंपनीच्या नावे बनावट वस्तू बनवत असल्याचे समोर आले आहे. देशातील एका नामांकीत मसाले कंपनीच्या नावाने बनावट मसाले तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार एका कारवाईच्या निमित्ताने समोर आला आहे. उल्हासनगरातील खेमानी परिसरातील बेवस चौक येथे काही दुकानदार नकली मसाले विकत असल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींना मिळाली.

या प्रकाराची खातरजमा केल्यानंतर या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उल्हासनगर पोलिसांच्या मदतीने येथे धाड टाकली. या कारवाईत दिलीप सिंग, सोहेल शेख, किशोर धनराजमल आहूजा, दिलीप सिंह, अमजद शेख आणि सुनील धनराजमल आहूजा यांच्या दुकानांवर छापे मारण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर बनावट चिकन आणि मटन मसाला जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी कंपनीच्या प्रतिनिधीच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध बौद्धिक संपदा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किती मसाले बनावट ? बनावट मसाल्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पराक्रम उघड झाल्यानंतर आता शहरात किती ठिकाणी हे मसाले विक्रीसाठी गेले आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. बनावट मसाले कुठे कुठे विक्रीसाठी पाठवण्यात आले आहेत हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या बनावट मसाल्यांमुळे ग्राहकांच्या आरोग्याचाही प्रश्न उपस्थित होण्याची भीती व्यक्त होते आहे.

Story img Loader