कल्याण-पडघा रस्त्यावरील देवरुंग गावातील एका गोदामातून आणि कल्याण शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या आवारातील बीएमडब्ल्यू कारमधून राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने रविवारी ५६ लाख ७५ हजार रुपयांचा विदेशी दारूचा बनावट साठा जप्त केला.
दमण, हरियाणा आणि महाराष्ट्रातील उत्पादित बनावट दारू साठ्याचे २९१ खोके जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा म्होरक्या बीएमडब्ल्यू वाहनाचा मालक दपीक जियांदराम जयसिंघानी या छाप्यानंतर फरार झाला आहे. हनुमंत दत्तू ठाणगे (६२), संदीप रामचंद्र दावानी (३४) यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा – ठाणे : डॉ. प्रभा अत्रे यांना यंदाचा ‘पं. हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
देवरंगू जवळील गोदामात विदेशीचा बनावटीचा दारू साठा करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे कल्याण विभागाचे निरीक्षक संजय भोसले यांना मिळाली होती. साठ्याची गुप्त पद्धतीने खात्री केल्यानंतर रविवारी सकाळी कल्याण, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर पथकांनी गोदामावर छापा मारला. गोणींमध्ये दारूच्या बाटल्या लपून ठेवल्या होत्या. या छाप्यानंतर कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीच्या वाहनतळावरून एक बीएमडब्ल्यू कार जप्त केली. या वाहनातून विदेशी मद्याचे २५ खोके जप्त केले. दारुबंदी कायद्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – …म्हणून शिवसैनिकाने मुलीचे नाव ‘शिवसेना’ ठेवले, डोंबिवलीतील प्रकार
उपायुक्त कोकण विभाग डाॅ. नीलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय भोसले, नंदकिशोर मोरे, अनिल पवार, राजेंद्र शिरसाट, संजय गायकवाड, दुय्यम निरीक्षक पूजा रेखे, मनोज निकम, कांतिलाल कवडे, सोमनाथ कोठुळे यांच्यासह २० हून अधिक पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.