लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: उल्हासनगर भागातील अनेक व्यावसायिकांनी जीन्स कारखान्यांची गोदामे कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा, माणेरे गावांच्या हद्दीत कल्याण डोंबिवली पालिकेची परवानगी न घेता उभारली होती. या गोदामांमुळे परिसरात जल, हवेतील प्रदूषण होत असल्याच्या वाढत्या तक्रारी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडे आल्या होत्या. ही सर्व गोदामे आय प्रभागाच्या तोडकाम पथकाने शुक्रवारी भुईसपाट केली.
प्रदुषणामुळे उल्हासनगरमधील जीन्स कारखाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन काही वर्षापूर्वी बंद करण्यात आले. हे कारखाने चालक आता उल्हासनगर शहराबाहेरील गाव हद्दीत चोरुन लपून जीन्स कारखाने, गोदामे सुरू करुन आपला व्यवसाय पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या गोदामांमुळे परिसरातील गावांमध्ये जलप्रदूषण, वायू प्रदूषण होत आहे.
आणखी वाचा- ठाणे- बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी, सुमारे चार किलोमीटर रांगा
उल्हासनगर शहरा शेजारील पण कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत चिंचपाडा, माणेरे येथे जीन्स कारखान्याची २२ बेकायदा गोदामे उभारण्यात आली आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त सुधाकर जगताप यांना दिली. ही गोदामे बेकायदा असल्याने आयुक्त दांगडे यांनी एका दिवसात जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंबरकर यांना दिले. अतिक्रमण नियंत्रण पथक, फेरावाला हटाव पथक आणि पोलीस बंदोबस्त घेऊन साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत २२ गोदामे जेसीबी, गॅस कटर, घणाचे घाव घालून जमीनदोस्त केली. आय प्रभाग हद्दीतील बेकायदा बांधकामाच्या विरुध्द मुंबरकर यांनी आक्रमक कारवाई सुरू असल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. एकावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात गोदामे तोडण्यात आल्याने जीन्स व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
“चिंचपाडा, माणेरे येथील बेकायदा जीन्स गोदामांच्या तक्रारी वाढल्या होत्या. या गोदामांमध्ये काही रासायिक घटक ठेवले जात होते. जल, वायू प्रदुषणाची समस्या या भागात निर्माण झाली होती. आयुक्तांच्या आदेशावरुन जीन्स गोदामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. ही गोदामे पुन्हा उभी राहणार नाहीत याची काळजी घेतली जाईल.”- हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त आय प्रभाग, कल्याण