भाईंदर : राज्यातील एकमेव तर देशात प्रसिद्ध असलेल्या मीरा भाईंदर मधील अॅल्युमिनियमच्या बांगडी व्यवसायाला दिवसेंदिवस उतरती कळा लागु लागली आहे. बाजारातील पर्यायी बांगड्यांमुळे मिळणारा तुटपुंजा नफा व त्या तुलनेत वाढेलला खर्च अश्या आर्थिक आव्हानांमुळे कारखाने बंद पडत असल्याचे दिसून येत आहे. मीरा भाईंदर हे पूर्वी पासून औद्योगिक वसाहतीचे शहर आहे. या शहरात होणारा स्टील, चष्मा आणि अॅल्युमिनियम बांगडीचा व्यवसाय राज्यात प्रथम स्थानी आहे. तर संपूर्ण देशात किंबहुना जगात या साहित्याचा पुरवठा केला जात असतो. मात्र मागील काही वर्षांपासून शहराची ओळख असलेले हे कारखाने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यात बांगडी कारखान्याचा देखील समावेश आहे.
मीरा भाईंदर मध्ये पूर्वी पासून ॲल्युमिनियम निर्मित बांगडी तयार केली जाते. या बांगडीला संपूर्ण देशातून मागणी आहे. प्रामुख्याने येथील तयार बांगडीचा माल हा मुंबई, उडीसा, कोलकत्ता, उत्तर प्रदेश आणि राजस्थान याठिकाणी जातो. अॅल्युमिनियमची बांगडी बनवण्यास साधारण पंधरा दिवसाचा कालावधी लागतो. यात जवळपास दहा प्रकारची प्रक्रिया करावी लागते. ही सर्व प्रक्रिया भाईंदर मध्ये जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरात होत असल्यामुळे बांगडी कारखानदारांनी येथेच आपले कारखाने उभारले आहेत. वर्ष १९९० पर्यंत शहरात जवळपास ९० ते १०० कारखाने होते.मात्र आता ही संख्या जेमतेम २५ ते ३० च्या घरात येऊन पोहचली आहे. त्यामुळे राहिलेल्या कारखान्यामार्फतच सध्या या बांगड्याची गरज भागावली जात आहे.
हेही वाचा : डोंबिवलीत सराफाचे दुकान फोडून ७५ लाखाच्या ऐवजाची चोरी
व्यवसायाला उतरती कळा लागण्याचे कारण :
अॅल्युमिनियमपासून तयार बांगड्याची पूर्वी देशभरात मोठी मागणी होती. या बांगड्या प्रामुख्याने देशाभरातील बाजारात सहज विकल्या जात होत्या किंबहुना आज ही विकल्या जात आहेत. मात्र मागील काही वर्षात या बांगड्यांना पर्याय म्हणून प्लास्टिकच्या व इतर लोखंडी, पितळेच्या बांगड्या बाजारात अधिक प्रमाणात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे अॅल्युमिनियमच्या बांगड्याची मागणी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. तर याच गोष्टीचा फायदा घेत बाजार व्यापारी बांगड्याना अपेक्षाप्रेमाने दर देण्याकडे पाठ करत आहेत. त्यामुळे कमी नफा ठेवून कारखानदारांना आपल्या बांगड्या विकण्याची वेळ आली आहे. याशिवाय कारखान्यातील वाढता खर्च आणि कुशल कामगारांच्या कमतरतेमुळे हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय कारखानदारांकडून घेतला जात आहे.
हेही वाचा : टिटवाळा लोकलमध्ये प्रथम श्रेणीच्या डब्यात प्रवाशाला मारहाण
सतत आकर्षक बांगड्या देण्याचे आव्हान :
बांगडी व्यवसायात सतत बांगड्यांचे ‘ट्रेंड’ हे झापट्याने बदलत असतात. त्यामुळे आकर्षक बांगडी तयार केल्यास त्याची मागणी बाजारात वाढते.या वाढलेल्या मागणी मुळेच आम्हांला यात नफा मिळवने शक्य होत असते. त्यामुळे नवनवीन आकर्षक बांगड्या तयार करण्याचे आव्हान आमच्यापुढे असल्याची माहिती ॲल्युमिनियम बांगडी कारखानदार महेंद्र मोरया यांनी दिली आहे.