लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : शहरातील कॅडबरी जंक्शन येथील सिंघानिया शाळेजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीला सर्वसामान्यांसह आता, शहरातील कलाकार मंडळी देखील हैराण झाले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी आज, याठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा व्हिडीओ काढून त्यांच्या फेसबूक पेजवर प्रसारित केला आहे. या व्हिडीओखाली ‘नागरिकशास्त्राच्या आईचा घो’ असे म्हणत या वाहतूक कोंडीवर संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शनजवळ सुलोचनादेवी सिंघानिया ही प्रतिष्ठीत शाळा आहे. या शाळेत बड्या शासकीय अधिकाऱ्यांचे तसेच राजकीय मंडळीचे मुले शिक्षण घेतात. त्यामुळे पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी चार चाकी वाहन घेऊन येतात. या वाहनांना शाळा प्रवेशद्वाराच्या आतमध्ये उभे राहण्यास परवानगी नसल्यामुळे ही वाहने रस्त्यावर उभे केली जातात. रस्त्यावर तीन मार्गीकेपर्यंत ही वाहने उभी असतात, त्यात शाळेच्या बस देखील या ठिकाणी उभ्या असतात. त्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या इतर वाहनांना याचा प्रचंड त्रास होत असून याठिकाणी वाहतूक कोंडी होत असतो
कॅडबरी जंक्शन हा रस्ता वाहतूकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. यामार्गावर सकाळ -संध्याकाळ मोठ्या संख्येने वाहनांची ये-जा सुरु असते. परंतू, ही शाळा भरण्याच्या वेळी आणि सुटण्याच्या वेळी या रस्त्यावर पालक बिनधास्त पणे तीन मार्गिकेपर्यंत वाहन उभी करताना दिसून येतात. गेले वर्षानुवर्षे हा प्रकार सुरु आहे. याकडे वाहतूक विभागाचे देखील दूर्लक्ष होत आहे. या वाहतूक कोंडीला सर्वसामान्य नागरिक हैरणा झाले असतानाच, आता ठाण्यातील कलाकार मंडळी देखील या वाहतूक कोंडीला त्रासले असल्याचे चित्र आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर या वाहतूक कोंडी संदर्भात संताप व्यक्त केला आहे.
विजू माने यांची फेसबुक पोस्ट
आमच्या ठाण्यातील एक प्रतिष्ठीत शाळा… या शाळेत मुलांना सोडायला येणारे तथाकथित सुसंस्कृत (?) सुशिक्षित(?) पालक शाळेच्या बाहेरील रस्त्यावर पाच पाच लेनमध्ये गाड्या उभ्या करतात. आपल्यामुळे इतर कोणाला त्रास होऊ नये याची जराही काळजी ते करत नाही. मागे अडकलेल्या वाहनात एखादी रुग्णवाहिका असेल तरीही या पालकांच्या गाडीचा टायर एक इंच ही हलत नाही. प्रत्येक ठिकाणी पोलीस उभा राहू शकत नाही, असे म्हणत त्यांनी या वाहतूक कोंडीवर संताप व्यक्त केला आहे.