खाद्यपदार्थ एकसारखाच असला तरी प्रत्येक ठिकाणी त्याची चव निरनिराळी असते. अस्सल खवय्ये नेहमीच उत्तम चवीच्या शोधात असतात. मराठमोळ्या पदार्थाची चव घरात बदलते. कारण प्रत्येक गृहलक्ष्मीचे वेगळे कौशल्य असते. काहींच्या हाताला चव आहे, असे आपण सहजपणे म्हणून जातो. भेळपुरीचेही असेच असते. भेळपुरी सर्वत्र मुबलक प्रमाणात उपलब्ध असली तरी प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळेपण असते. ठाण्यातील कोपरी विभागातील गुप्ता भेळपुरीची चव चाखण्यासाठी अगदी वाट वाकडी करून अगदी ठाणे शहराच्या विविध भागातून खवय्ये गर्दी करतात.
भेळपुरी ही कुरमुरे आणि त्यात चटणी व इतर जिन्नस टाकून बनविला जाणारा मुंबईचा व महाराष्ट्राचा पदार्थ आहे. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, दादर चौपाटी अशा समुद्रकिनारी भेळपुरी खाण्यातली मजा काही औरच आहे. या भेळपुरीमध्ये काहीजण फक्त हिरवी चटणी टाकतात तर काही जण चिंचेची चटणी टाकतात. या भेळपुरीचे विविध प्रकार असतात. सुकी भेळ, भडंग, तसेच जैन भेळ असे अनेक प्रकार आहेत. कोलकत्ता येथे या भेळपुरीला जल मुरी असेही संबोधले जाते तर बंगळूर येथे या भेळपुरीला चुरमुरी असे नाव आहे. संध्याकाळी नाश्त्यासाठी हा पदार्थ खाल्ला जातो. भेळीची चव हे ट्रेडसिक्रेट असते. भेळ बनविणारा सहसा ते कुणाला सांगत नाही. गुप्ता भेळपुरी सेंटरचे मालक कतवारू गुप्ता यांनी त्यांच्याकडच्या भेळीच्या चवीचे गुपित कोणतेही आढेवेढे न घेता उघड केले. खजूर तसेच गुळ, चिंच, साखर आदी गोष्टी एकत्र करून त्यास फोडणी दिली जाते. गोड चटणी ते स्वत घरी तयार करतात. तसेच तिखट चटणी बनविण्यासाठी आलं, लसूण, पुदिना, धणे याचा वापर केला जातो. विशेष म्हणजे गुप्ता यांनी भेळ बनविण्याची खासियत तशीच ठेवली असून एका प्लेटमध्ये भरपूर भेळ खायला मिळते. जैन भेळपुरीमध्ये कांदा, बटाटा नसतो. दरदिवशी प्रत्येकी दहा किलो हिरवी चटणी आणि गोड चटणी बनवावी लागते, असे गुप्ता यांनी सांगितले. दिवसभरात खवय्ये चुरमुऱ्यांची २० ते २५ मोठी पाकिटे खाऊन फस्त करतात. भेळपुरी खाण्यासाठी सिंधी, आगरी, तसेच जैन समाज नेहमीच गर्दी करताना दिसतो. संध्याकाळी महिलांची गर्दीही लक्षणीय असते. पूर्वी येथे फक्त भेळपुरी मिळत होती. मात्र हल्ली खवय्यांच्या मागणीनुसार शेवपुरीही दिली जाते. अर्थात शेवपुरीची चवही तितकीच वैेशिष्टय़पूर्ण आहे. शेवपुरी दोन प्रकारांची असते. एक गोल पुरी व चपटी पुरी. दोन्ही पदार्थाना चटणी एकच असते. चपटय़ा पुऱ्या गुप्ता स्वत:च बनवितात. त्या पुऱ्या चांगल्या प्रतीच्या तेलात तळल्या जातात.
गुप्ताभैय्या पूर्वी गाडी लावून येथे बसत असे. त्यानंतर त्यांनी त्याच परिसरात आपले छोटेसे दुकान थाटले. दुकान अगदीच छोटे असल्याने दुकानाबाहेर उभे राहूनच खावे लागते. अगदी सुरुवातीच्या काळात गुप्ताभैय्या यांनी १५ पैशाला भेळ विकली आहे. आता त्याची किंमत २५ रुपये आहे. गेली ३५ वर्षे गुप्ताभैय्या हा व्यवसाय करीत आहेत. ठाणे पश्चिमेकडील अनेक नागरिक येथे खास भेळ खाण्यासाठी येतात असे गुप्ताभैय्यांनी आवर्जून सांगितले. आजकाल भेळ किंवा पाणीपुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी देतात, परंतु गुप्ताभैय्या फक्त पुरी न देता कुरमुरे, शेव, तसेच कोथिंबीर आणि मिरचीची थोडीशी पेस्ट टाकून पोटभर भेळ खावयास देतात. गुप्ताभैय्या ग्राहकच आपले देव आहेत असे मानतात. त्यांची खाण्याची काळजी घेणे कर्तव्य असल्याचे सांगून भूक लागलेली असताना माणूस जेव्हा खातो त्यावेळी तो आपल्याला भरभरून आणि मनापासून आशीर्वाद देतो, अशी त्यांची भावना आहे. भेळ हा खरे तर संध्याकाळी खाण्याचा पदार्थ आहे. परंतु गुप्ताभैय्याकडील भेळ खाल्ल्यावर रात्री जेवणच करू नये असे वाटते. त्याची चव जीभेवर सतत रेंगाळते आणि येथील भेळपुरी दररोज खावी असेच खवय्यांना वाटत राहते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा