मिसळ, वडा-भजीचा कंटाळा आल्यानंतर अनेकजण चव बदलण्यासाठी पावभाजीकडेच वळतात. लोण्यामध्ये भिजलेल्या गरम पावाबरोबर कांदा घातलेली व लिंबू पिळलेली लाल-लाल भाजी खाण्याचा आनंद अवर्णनीय असतो. त्यामुळे अनेक खवय्ये निवांत बसून पावभाजी खाणे पसंत करतात. बदलापूर शहरातल्या खाद्यपरंपरेत वडा-मिसळला ऐश्वर्य लाभले असताना त्यांच्या पाठीमागून आलेली एका पावभाजीची चव शहरात अल्पावधीत लोकप्रिय झाली. बदलापूर पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळच शांभवी पावभाजी सेंटर असून इथली चवदार पावभाजी हा शहरातील खवय्यांचा आवडता अड्डा झाला आहे. इतकेच नव्हे तर, इथे पावभाजीच्या बरोबरीने मिळणारे अन्य पदार्थही आता येथील महाविद्यालयीन तरुणाईच्या जिभेचे चोचले पुरवत आहेत.
बदलापूर पूर्वेकडे मिळणारी शांभवीची पावभाजी हे शहरातल्या चवदार स्नॅक्स कॉर्नरपैकी एक. नीलेश निसाळ यांनी पत्नीसोबत १६ वर्षांपूर्वी १९९९ मध्ये शांभवी स्नॅक्स आणि आइस्क्रीमची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी केवळ आइस्क्रीमचीच विक्री सुरू केली होती. मात्र, सुरुवातीचे ३-४ महिने ग्राहकच न आल्याने त्यांनी व्यवसायाचा फेरविचार सुरू केला. बदलापुरात कोणता खाद्यपदार्थ नाही याची पाहणी करण्यास त्यांनी सुरुवात केली. सर्वेक्षणाअंती त्यांना बदलापुरात पावभाजी केंद्र नसल्याचे आढळून आले. त्याबरोबरच त्यांनी चांगला शेफ बघून पावभाजी सुरू करण्याचा घाट घातला आणि अल्पावधीतच त्या पावभाजीला मागणी वाढू लागली. ग्राहकांमध्ये तरुणाईची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांनी चाटचे पदार्थ व पिझ्झा, बर्गर, सॅण्डवीचेस ठेवण्यात सुरुवात केली. यात, आइस्क्रीम मागे पडले व पावभाजी पुढे आली. शांभवी पावभाजी सेंटर हा तरुणांचा एकमेकांना भेटण्याचा अड्डा ठरला.
सध्या पावभाजीचे तीन प्रकार इथे मिळतात. यात, स्पेशल बटर पावभाजी जी बटरमध्ये गरम केलेला पाव, कांदा, लिंबू, काकडी-टोमॅटो व बटरयुक्त कोथिंबीर पसरलेली लाल भाजी अशा स्वरूपात मिळते. तसेच जैन धर्मीयांसाठी कांदा-लसूण नसलेली जैन पावभाजीही येथे मिळते. तसेच शांभवीचे एक वेगळेपण म्हणजे येथे खडा पावभाजी मिळते. खडा पावभाजी म्हणजे ज्यात सगळ्या भाज्या या एकजीव नसून आख्ख्याच असतात. त्यामुळे अनेक जण आख्ख्या भाज्या असलेल्या खडा पावभाजीला आपली प्रथम पसंती देतात. तसेच, येथे चाटच्या पदार्थामध्ये शेवपुरी, पाणीपुरी, रगडा पॅटिसही मिळते. यातील पाणीपुरी मात्र वेगळ्या स्वरूपात मिळत असून एकाच डिशमध्ये गरम रगडा भरलेल्या सहा पुऱ्या व त्यासोबत दोन वाटय़ांमध्ये गोड चटणी व पाणीपुरीचे तिखट पाणी मिळते. त्यामुळे खवय्ये आपापली पाणीपुरी स्वत:च तयार करण्याचा मनस्वी अनुभव येथे घेतात. याचबरोबर संपूर्ण डिशमध्ये पावभाजीच्या मसाल्यातला मसाला पाव व तवा पुलाव येथे मिळतो. जेणेकरून अनेकांची जेवणाची वेळही येथे भागते. टोस्ट सॅण्डवीच, चीज सँण्डवीच, वेज सँण्डवीच आणि हॅवमोर या प्रसिद्ध उत्पादनाचे गोड आइस्क्रीम शांभवीत मिळते.
खाऊखुशाल : बदलापूरमधील ‘पावभाजी’ अड्डा
मिसळ, वडा-भजीचा कंटाळा आल्यानंतर अनेकजण चव बदलण्यासाठी पावभाजीकडेच वळतात.
Written by संकेत सबनीस
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-01-2016 at 01:07 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous pav bhaji in badlapur