महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेचा आढावा घेताना वडापावचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. वडापावची रेसिपी सर्वसाधारणपणे सारखीच असली तरी जशी दर पाच मैलांवर भाषा बदलते, तशी प्रत्येक नाक्यावरच्या वडापावची चवही बदलते. खरे तर हे अस्सल मुंबईकरांचे खाद्य. धावपळीच्या वेळी चटकन भूक भागविणारे. मात्र आता मुंबईतला वडा राज्याच्या कानाकोपऱ्यात अगदी खेडोपाडीही पोहोचला आहे. प्रत्येक ठिकाणची चव वेगवेगळी असते. कारण भाजी बटाटय़ाचीच असली तरी त्यातील मसाले मात्र वेगवेगळे असतात. त्यामुळे कोणत्याही गावी गेल्यावर खवैय्ये तेथील लोकप्रिय वडय़ाची चव आवर्जून पाहतात. काही ठिकाणी वडापावसोबत दिली जाणारी चटणी खास असते. गेल्या काही वर्षांत चौथी मुंबई म्हणून विकसित होत असलेल्या बदलापूर परिसरातील मुळगाव येथील बटाटावडाही असाच लोकप्रिय आहे. बदलापूरहून बारवी धरणाकडे जाताना वाटेत मुळगाव लागते. येथील डोंगरावर खंडोबाचे मंदिर आहे. त्यामुळे बारवी धरण, त्या परिसरातील जंगल तसेच पुढे मुरबाडकडे जाणारे पर्यटक आणि प्रवासी मुळगाांमधील ‘वैजयंती’ धाब्यावर थांबून तेथील वडापावची चव चाखतात. अंबरनाथ-बदलापूर परिसरातील अनेकजण तर खास वडापाव खाण्यासाठी मुळगावची सैर करतात.
बदलापूरपासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर बारवी धरणाच्या रस्त्यावर निसर्गरम्य परिसरात मुळगाव लागते. येथे गेल्या दहा वर्षांपासून वैजयंती धाबा आपल्या चविष्ट बटाटावडय़ासाठी प्रसिद्ध आहे. धाब्याचे मालक चंद्रकांत लाड यांनी गेली दहा वर्षे वडय़ाची चव कायम राखली आहे. त्यामुळे खवैय्यांनी एकमेकांना केलेल्या शिफारशीने या धाब्याची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. येणारे-जाणारे पर्यटक वाटेत खाण्यासाठी मुळगावला पसंती देतात. अनेकदा येथून पार्सलही घेऊन जातात. हल्ली मुंबईतील बटाटय़ावडय़ाची चव अक्षरश: बदलली असून त्यामुळे पोटाचे विकार वाढल्याचेही समोर आले आहे. वैजयंती धाब्यावर वडय़ाच्या चवीबरोबरच तो बादणार नाही, याचीही काळजी घेतली जाते. त्यासाठी भाजीमध्ये आलंआणि लसणीचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे हा वडा खाऊन कोणताही त्रास होत नाही, असे खवय्ये आवर्जून सांगतात. प्रत्येक गावच्या मसाल्याची चव वेगळी असते. मुळगावचा वडा खाल्ल्यावर त्याची प्रचीती येते. गेल्या दहा वर्षांत वडा खाऊन कुणाला त्रास झाल्याचे ऐकिवात नसल्याचे चंद्रकांत लाड खात्रीपूर्वक सांगतात. दिवसभर या धाबा सुरू होतो. सर्वसाधारणपणे दररोज ३५० ते ४०० वडे विकले जातात. सुट्टीच्या दिवशी आणखी जास्त वडय़ांची विक्री होते. काही खवय्ये एका बैठकीत चार ते पाच वडे फस्त करतात. वडय़ासोबत ठेच्यासारखी चटणी देण्यात येते. त्यामुळे अनेकजण पावासोबत वडा न खाता फक्त वडा खाण्याला पसंती देत असतात. अनेकदा बारवी धरणक्षेत्र परिसर किंवा मुरबाडकडे जाणारे प्रवासी येथे थांबून वडय़ाचा आस्वाद घेतात. बदलापूर, अंबरनाथ आणि कल्याणसह ठाण्यापासून अनेक खवय्ये फक्त वडा खाण्यासाठी येथे येताना पाहिल्याचे चंद्रकांत लाड सांगतात.
भाकरीवडा
वडापाव ही कधीही न तुटणारी जोडी असली तरी त्यालाही काही ठिकाणी अपवाद आढळून येतात. मांसाहारी खाद्य पदार्थ पुरविणाऱ्या काही मंडळींनी पावातला वडा काढून त्यात तेलावर परतलेला जवळा भरून द्यायला सुरुवात केली आहे. ‘वैजयंती’ धाब्यावर याच्या नेमका उलटा प्रकार पाहायला मिळतो. पाव नको असलेली मंडळी येथे उपलब्ध असलेल्या भाकरीसोबत वडा आणि चटणी खाणे पसंत करतात.
आगरी पद्धतीचा मांसाहार
घरगुती मसाल्यांत बनवलेल्या मटण आणि चिकनलाही येथे खूप मागणी असते. बदलापूरजवळ अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे बदलापुरात पर्यटकांचा चांगला वावर असतो. अशा वेळी अनेक पर्यटक मासांहारी जेवणासाठी ‘वैजयंती’ धाब्याला पसंती देतात. धाबा म्हटले की येथेच्छ मद्य आणि धूम्रपान असे जणू काही समीकरणच बनले आहे. ‘वैजयंती’ धाबा मात्र त्याला अपवाद आहे. तिथे धूम्रपान आणि मद्यपानाला बंदी असून हा नियम कठोरपणे अमलात आणला जातो. त्यामुळे साहजिकच सहकुटुंब सहलीला अथवा प्रवासाला निघालेली मंडळी या धाब्याला पसंती देतात. केवळ वडापावच नव्हे तर शाकाहारी आणि मांसाहारी जेवणही येथे उत्तम मिळते. अस्सल आगरी पद्धतीच्या पदार्थासाठी ‘वैजयंती’ धाब्याला या भागात तोड नाही. तशी या धाब्यावर बारमाही खवय्यांचा राबता असतो. मात्र पावसाळ्यात विशेष गर्दी असते. सध्या आषाढ महिना असल्याने वेगळ्या चवीचा मांसाहार करू इच्छिणारे खवय्ये वाट वाकडी करून ‘वैजयंती’ धाबा गाठतात.
वैजयंती धाबा, मुळगाव, बदलापूर-बारवी रस्ता, तालुका अंबरनाथ