|| ऋषिकेश मुळे
पुन्हा पंचनामे होणार नसल्याने शेतकरी भरपाईला मुकणार; दोन महिन्यांपूर्वीच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना फटका : – जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांत निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या भातपीक नुकसानातून शेतकरी सावरताच न तोच सध्या परतीच्या पावसाने त्यांची उरलीसुरली शेतीही वाहून गेली आहे. ठाणे जिल्ह्य़ात यंदा २६ हजार ६४४ हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. मात्र, दोन महिन्यांपूर्वी पूरग्रस्त भागांत शासकीय यंत्रणेकडून शेतीनुकसानीचे पंचनामे करण्यात आले असल्याने त्या ठिकाणी नव्याने पंचनामे होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांमधील भातशेतीचे मोठे नुकसान झाले. ऐन भातपीक काढण्याच्या दिवसातच परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. ठाणे जिल्ह्य़ात भातलागवडीखालील क्षेत्रफळ ५४ हजार हेक्टर इतके असून यंदा ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे यापैकी २६ हजार ६४४ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत १५ हजार १३८ हेक्टर शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. ३१ ऑक्टोबरपासून हे पंचनामे सुरू झाले असून बुधवार, ६ नोव्हेंबपर्यंत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सुरू असणार असल्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
जुलै, ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस होऊन जिल्ह्य़ात पाच तालुक्यांमध्ये मिळून ६ हजार ३६१ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले होते. दरम्यान जुलै, ऑगस्टमध्ये नुकसानभरपाईसाठी शेतीचा पंचनामा झाला असल्यास आणि त्याच शेतकऱ्याच्या शेतीचे ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसामुळेही नुकसान झाले असल्यास अशा शेतकऱ्याच्या शेतीचा पुन्हा पंचनामा करण्यात येणार नाही. तसेच त्या शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा पुन्हा नुकसानभरपाई मिळणार नाही, असे ठाणे जिल्हा कृषी अधीक्षकांनी सांगितले. त्यामुळे जुलै, ऑगस्टच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळेही नुकसान झाले असले तरी भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे.
शहापूर, भिवंडीत सर्वाधिक हानी
परतीच्या पावसामुळे शहापूर आणि भिवंडी तालुक्यांमधील भातशेतीचे अधिक नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहापूर तालुक्यात ७ हजार ९०० हेक्टर तर भिवंडी तालुक्यात ७ हजार ३५० हेक्टर भातशेतीचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील पंचनामे पूर्ण झालेले भातशेतीचे क्षेत्र ४ हजार ६० इतके आहे तर भिवंडी तालुक्यातील पंचनामे पूर्ण झालेले भातशेतीचे क्षेत्र ३ हजार ६२० इतके आहे.
ऑक्टोबरमध्ये नुकसान झालेल्या भातशेतीचा जुलै, ऑगस्टमधील पावसानंतर पंचनामा झाला असल्यास पुन्हा त्या शेतकऱ्याला भरपाई मिळणार नाही. मात्र यापूर्वी पंचनामा झाला नसल्यास त्या नुकसानभरपाई जरूर मिळेल. – अंकुश माने ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक