कल्याण – ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील डोळखांब भागात आणि अंबरनाथ तालुक्यातील मलंग गड पट्ट्यातील कुंभार्ली, चिरड भागात शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडी बरोबर कांदा पिकाची लागवड सुरू केली आहे. कांदा पिकातून भरघोस उत्पन्न मिळत असल्याने ठाणे जिल्ह्यातील शेतकरी हळुहळू कांदा लागवडी वळत असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यास सुरूवात केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शेती पिकांसाठी पुरेशा पाण्याचा अभाव, कडक उन्हाळा, हवामानातील बदलामुळे ऑक्टोबर ते मे या कालावधीत भाजीपाला, कडधान्य या पिकांसाठी अनुकूल मानली जाते. या भागात नाशिक, जुन्नर, अहिल्यानगरमध्ये होत असलेली व्यापारी पिके तयार होतील की नाही याविषयी ठाणे जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच सांशक राहिला आहे. शेतीत व्यापारी शेतीचे प्रयोग करून आर्थिक नुकसान झाले तर त्याची झळ का सोसायची, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच उपस्थित करतो.

या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात गुंडे गावात कृष्णा मिंडे यांनी दोन एकर क्षेत्रात दुबार भात पिकांसह कांदा पिकाची जोखीम घेऊन लागवड केली. कांद्याची लागवड केल्यानंतर त्याला वेळच्या वेळी पाणी, आवश्यक सेंद्रिय खतांची मात्रा दिली. जानेवारी ते मार्च या कालावधीत शेतकरी कृष्णा मिंडे यांनी सहाशे क्विंटल कांद्याचे उत्पादन घेतले आहे. जमिनीची सुपिकता राखण्यासाठी सेंद्रिय खताचा प्राधान्याने वापर केला. तयार कांदा कृष्णा यांनी नवी मु्ंबईतील वाशी, जुन्नर, मंचर, खेड येथील बाजारपेठांमध्ये विक्री करण्यास सुरुवात केली आहे. कांदा लागवड ते काढणीपर्यंतच्या कालावधीत कृष्णा यांचे सुमारे तीन लाख रूपये मजुरी, बि बियाणे, इतर आवश्यक कामांसाठी खर्च झाले. हा खर्च जाऊनही त्यांना सुमारे पाच लाखाचा निव्वळ नफा झाला आहे. परिसरातील मजुरांना या माध्यमातून रोजगाराचे साधन तयार झाले आहे.

पांढऱ्या कांद्याचीही लागवड

अंबरनाथ तालुक्यातील मलंग गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या कुंभार्ली, चिरड गाव हद्दीत शेतकऱ्यांची पांढऱ्या कांद्याची लागवड केली आहे. या लागवडीतून शेतकऱ्यांचे रग्गड पीक आणि उत्पन्न मिळाले आहे. कृषी विभागाने या लागवडीची दखल घेऊन नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

कोटजोखीम आणि जिद्दीने कांदा पिकाची लागवड केली. कष्ट, मेहनत आणि लागवडीचे योग्य नियोजन केल्याने चांगले उत्पन्न कांदा लागवडीतून मिळाले आहे. – कृष्णा मिंडे, शेतकरी, शहापूर.

कांदा लागवड प्रतिक्रिया

शहापूर परिसरात कांदा लागवडीचे नावीन्यपूर्ण प्रयोग शेतकरी करत आहेत. त्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन, या लागवडविषयक कार्यशाळांमधून मार्गदर्शन करतो. घरगुती पध्दतीने कांदा लागवड करून त्यानंतर शेतकरी व्यापक प्रमाणातील या शेतीकडे वळत आहेत. शेतकऱ्यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाला आम्ही मार्गदर्शन करतो. – कुमार जाधव, तालुका कृषी अधिकारी, शहापूर.