ठाणे : जिल्ह्यातील पारंपरिक भातशेतीला जोड देत अधिक उत्पन्नासाठी शेतकरी फळलागवडी समवेतच फुलशेतीकडे वळताना दिसून येत आहे. याच पद्धतीने भिवंडी तालुक्यातील कोलीवली येथील संतोष पाटील या शेतकऱ्याने चार एकर मध्ये सोनचाफ्याची लागवड करून उत्तम अर्थार्जन केले आहे. सेंद्रिय खतांचा वापर, शेतात बांधलेले शेततळे यामुळे सोनचाफ्याचे उत्तम पीक संतोष पाटील घेत असून जवळच असलेल्या कल्याण एपीएमसीमधील फुलबाजारात नियमित फुलांची विक्री ते करत आहे. यामुळे त्यांना सध्या सुरुवातीच्या काळात प्रतिमहिना ४० ते ५० हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळत आहे.
ठाणे जिल्हा प्रामुख्याने ओळखला जातो भातशेतीसाठी. शहापूर, मुरबाड, भिवंडी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून बदलेले वातावरण आणि यामुळे अवकाळी पावसाचे वाढलेले प्रमाण याचा थेट परिणाम या भातशेतीवर अनेकदा दिसून येतो. यामुळे बहुतांश वेळी काढणीसाठी आलेले भाताचे पीक खराब झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. यामुळे मागील दोन ते वर्षात जिल्ह्यातील शेतकरी फळशेतीकडे वळल्याचे दिसून आले आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. तर चवीला गोड आणि रसाळ असल्याने ठाणे जिल्ह्याच्या आंब्याला ही बाजारात उत्तम पसंती मिळत असल्याने जिल्हा आंबा पिकाच्या उत्पादनात कोकणातील इतर जिल्ह्यांच्या पंक्तीत आला आहे. याच बरोबर आता शेतकरी फुलशेतीकडे देखील वळला आहे. एक शाश्वत आणि गतीने उत्पन्न मिळवून देणाऱ्या या शेतीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्तम अर्थार्जन तर होतच आहे तर पारंपरिक पिकांना शेतकऱ्यांना एक पर्याय ही मिळाला आहे.
हेही वाचा…गुणवत्ता वाढीसह आता पटसंख्या वाढीवरही जिल्हा परिषदेचा भर, यासाठी दिशा उपक्रम ठरतोय़ लाभदायी
” सौंदर्या ” सोनचाफ्याचा दरवळ
सोनचाफा फुलाची विशेष ओळख म्हणजे दीर्घकाळ टिकणारा सुवास. यातही विशिष्ट जातीच्या सोनचाफ्याची अधिक विक्री होते. याचाच अभ्यास करत संतोष पाटील यांनी आपल्या चार एकरच्या क्षेत्रात सौंदर्या जातीच्या सोनचाफ्याची लागवड केली आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत त्यांनी दोन टप्प्यांमध्ये आपल्या शेतात १ हजार ४०० झाडांचे रोपं केले. या झाडांची आता वाढ झाली असून प्रतिदिन हजारो फुले या ठिकाणी काढली जातात. तर याची विक्री कल्याण येथील एपीएमसी फुलबाजारात केली जाते. तसेच आता या झाडांची वाढ खुंटवून फुलांचे प्रमाण वाढविण्यासाठी संतोष पाटील यांचे नियोजन सुरु आहे. यामुळे येत्या वर्षभराच्या कालावधीत फुलांची संख्या देखील दुप्पट होणार असून त्यांच्या मासिक उत्पन्नात देखील दुपटीने वाढ होणार आहे. तसेच पाण्याची कमतरता भासू नये यासाठी त्यांनी आपल्या शेतातच शेततळे बांधले आहे.मात्र सुदैवाने त्यांना तळ्याची उभारणी करताना जिवंत झरे लागल्याने पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागला असल्याची माहिती शेतकरी संतोष पाटील यांनी दिली आहे. तर यासाठी केवळ आणि केवळ सेंद्रिय खतांचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
सूर्यफुलाच्या आंतरपिकातून उत्पन्न
सोनचाफ्याच्या मुख्य पिकासह संतोष पाटील यांनी आपल्या शेतात सूर्यफुलाची देखील लागवड केली आहे. सूर्यफुलाच्या तेलाची उत्तम मागणी असते. यामुळे तेलघाण्यानां फुलांची विक्री करून यातूनही चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा…नाताळासाठी बाजार सजले, ऑनलाईन बाजारपेठांमध्ये विशेष सवलती; सांताच्या टोपी, पोशाखाला ग्राहकांची मागणी
पारंपरिक पिकांना बदलत्या हवामानाचा मोठा फटका सहन करावा लागतो. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता फळबागांची लागवड आणि फुलशेती कडे वळू लागला आहे. यामुळे त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न ही मिळत आहे. तसेच यासाठी त्यांना कृषी विभागाकडून योग्य ते साहाय्य केले जाते. विवेक दोंदे, कृषी पर्यवेक्षक, भिवंडी