बदलापूरः मार्च महिन्यात रोजहार हमी योजनांसह महिलांच्या विविध योजनेतील वेतन रखडल्याने आदिवासी महिलांना आंदोलन करण्याची वेळ आली होती. आता एप्रिल महिन्यात ठाणे जिल्ह्यातील भात शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली आहे. एप्रिल महिना सुरू झाला तरी शेतकऱ्यांना भात पिकाचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. अनेकांना आपली पीक कर्जे फेडायची असून त्यातही अडथळे येत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.

ठाणे जिल्ह्यात बहुतांश शेतकरी पावसाळ्यात भात पिकाची लागवड करतात. आधीच भात शेती दिवसेंदिवस महागडी होत चालली आहे. भात शेतीसाठी लागणारे मजूर उपलब्ध होत नसल्याने त्यांना अधिकची रोजंदारी द्यावी लागते. बहुतांश शेतकरी मजुरांच्या दोन वेळच्या जेवणाचाही खर्च उचलतात. त्यामुळे आधीच भात शेती संकटात असताना शासनाच्या रखडणाऱ्या कारभारामुळे ठाणे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत.

भाताचे पीक हाती आल्यानंतर शासकीय भात खरेदी केंद्रांवर त्याची विक्री शेतकरी करत असतात. ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक हमीभाव योजनेअंतर्गत शासनाला जानेवारी महिन्यात भात पीक विकले. त्यानंतर भात पिकाचे पैसे मिळतील म्हणून शेतकरी सरकारकडे डोळे लावून होते. मात्र एप्रिल महिना उजाडला तरी शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

अनेक शेतकरी शेती करण्यासाठी स्थानिक सोसायटी किंवा खासगी कर्जे घेतात. डिसेंबर – जानेवारीपर्यंत भात पिकाची विक्री करून त्यांना मार्चपर्यंत पैसे मिळतात. मात्र यंदा हे पैसे परत न मिळाल्याने कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी त्यांना वेगळी आर्थिक तरतूद करण्याची वेळ आली आहे. अनेकांना अधिकचे व्याज द्यावे लागते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

शेकडो शेतकऱ्यांचे पैसे अडकले

ठाणे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे पैसे वेळीच मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. एकट्या मुरबाड तालुक्यातील अदिवासी विकास महामंडळाच्या पाटगाव,माळ आणि धसई या तीन खरेदी केंद्रावर १५ हजार ८०० क्विटल भात खरेदी केला गेला. तसेच मुरबाड सहकारी संघाकडे एकूण ७ हजार ७२८ शेतकऱ्यांनी भात विक्रीसाठी नोंदणी केली आहे.

४ हजार ३४२ शेतकऱ्यांकडून ९६ हजार ४३५ क्विंटल भात खरेदी केला. त्यापैकी फारच थोड्या शेतकऱ्यांना भात पिकाचा मोबदला मिळाला असल्याची माहिती आहे. तर ज्यांना मोबदला मिळाला त्यात अनेक व्यापाऱ्यांचा समावेश आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. चौकटः काही तांत्रिक अडचणी उद्भवल्याने शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यास उशिर होतो आहे. मात्र त्यातही सुमारे १६९ शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आल्याची माहिती दुधनोली भात खरेदी केंद्र प्रमुख पी. मारशिटवार यांनी दिली आहे. यात उर्वरित ४०० शेतकऱ्यांना लवकरच मोबदला दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.