सन २०१७ ते २०२२ या कालावधीत आदिवासी सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून नियमित शेती पीक लागवडीसाठी जिल्हा, राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज घेऊन त्या कर्जाची नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा काही महिन्यापूर्वी केली. घोषणा होऊन तीन महिने उलटुनही ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ तालुक्यांमधील अनेक पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी मिळाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
हेही वाचा- कल्याणमध्ये बिर्ला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्याला बेदम मारहाण
दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महात्मा फुले कृषी शेतकरी प्रोत्साहन सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेतील निधी १५ दिवसात नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे जाहीर करण्यात आले होते. दिवाळीच्या दिवसात प्रोत्साहन योजनेचा ५० हजाराचा निधी उपलब्ध होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पीक हंगामासाठी या निधीचा उपयोग करण्याची तयारी केली होती. दोन महिने उलटूनही प्रोत्साहन योजनेचा निधी बँक खात्यात जमा होत नसल्याने शेतकऱी नाराज झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही अवस्था तर इतर जिल्ह्यात काय परिस्थिती असेल, असे प्रश्न नाराज शेतकऱ्यांकडून केले जात आहेत.