ठाणे – शहरीकरण वाढत असले तरी,कमी खर्चात उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे यासाठी पशुपालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी शेतीसह जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करावे असे आवाहन, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी शेतकरी आणि पशुपालकांना केले. जिल्हास्तरीय आयोजित करण्यात आलेल्या पशुपक्षी प्रदर्शनात ते बोलत होते.

शेतकरी आणि पशुपालकांचे जीवनमान उंचवावे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच शेतकरी आणि पशुपालकांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी याकरिता ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन भिवंडीतील बापगावात आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रशांत कांबळे आणि प्रमुख पाहुणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी प्रशांत कांबळे यांनी जिल्हास्तरीय प्रदर्शन ज्या पद्धतीने आयोजित करण्यात आले, त्याच पद्धतीने तालुकास्तरीय प्रदर्शन आयोजित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रदर्शनात चाऱ्याचे बियाणे तसेच तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभल्यामुळे पशूपालकांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. २१ वी पशुगणना करण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि राष्ट्रीय पशुधन अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन पशुपालकांनी जास्तीत जास्त अर्ज करावे, असे आवाहन डॉ. प्रशांत कांबळे यांनी केले.

या प्रदर्शनात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग शहरालगत असल्याने बाजारपेठ उपलब्ध आहेत, त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पशुपालन करावे. तर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समिर तोडणकर यांनी प्रास्ताविक करताना पशुपालन व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन यशस्वी उद्योजक होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

आदर्श पशुपालकांचा सन्मान

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी देखील प्रदर्शनास भेट देऊन पशुपालकांना मार्गदर्शन केले. आदर्श गुणवंत अधिकारी-कर्मचारी सन्मान व आदर्श पशुपालकांचा सन्मान घुगे यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रदर्शनात १६० प्रजातीचे पशुपक्षी

या प्रदर्शनात पशुधनांचे स्टॉल ६०, इतर स्टॉल १५ असे एकूण ७५ स्टॉल लावण्यात आले होते. प्रदर्शनात जात निहाय पशुधन १००, पक्षी ६० पाहण्यासाठी उपलब्ध होते. मुऱ्हा, जाफराबादी, डांगी, गीर, खिल्लार, पुंगलुरू, मारवाड, सीजत, शेळी, काठीयावाडी, फायटर, जर्सी कॉस, राजहंस, ससे, बदक, कोबंडी, गिरीराज/ कडकनाथ इत्यादी सर्व प्रकारचे जनावरांच्या जातीचे पशुपक्षी या प्रदर्शनात पाहायला मिळाले.

Story img Loader