लोकसत्ता प्रतिनिधी
अंबरनाथ: येत्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय शिक्षणाचा श्रीगणेशा अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू होणार असला तरी आता येथील सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटीने महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आरक्षित केलेल्या जागेवरच आक्षेप घेतला आहे. सोसायटीच्या सदस्यांनी नुकतीच याबाबत पत्रकार परिषद घेत याविरुद्ध याचिका दाखल करण्याबाबत तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अंबरनाथ पूर्वेत सुमारे २१० एकर परिसरावर शेतकी सोसायटी पसरलेली आहे. शेती आणि शेतीपूरक उपक्रमांसाठी शासनाने जी जागा दिली होती. यातील सर्वेक्षण क्रमांक १८० हा भूखंड सिटी पार्कसाठी आरक्षित करण्यात आला होता. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाने काही वर्षांपूर्वी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मंजूर करण्यात आले. या प्रकल्पासाठी सिटी पार्कचा भूखंड देण्यावर निश्चित झाले. त्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर या वैद्यकिय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रवेश तयारी, त्यासाठी वैद्यकीय अधिष्ठाता यांची नियुक्ती अशी विविध टप्प्यांवर प्रक्रिया झाली.
आणखी वाचा-ठाण्याची हवा मुंबईपेक्षा बरी, शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२० ते १३८ इतका
काही दिवसांपूर्वी शैक्षणिक वर्गांसाठी आवश्यक जागेची शोधाशोधही सुरू करण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया वेगाने सुरू असताना ही जागा ज्या शेतकी सोसायटीत येते त्या अंबरनाथ सामुदायिक शेतकी सोसायटी सदस्यांनी या जागा निश्चितीला आक्षेप घेतला आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी सिटी पार्कचे आरक्षण बदलण्याचा घेण्यात आलेला शासन निर्णय शेतकी सोसायटीला अमान्य असल्याची भूमिका सोसायटीचे अध्यक्ष विश्वास म्हस्के आणि सदस्यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. त्यामुळे आरक्षित जागी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यास सोसायटीने विरोध दर्शवला असून या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याचे या सदस्यांनी सांगितले आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा मार्ग खडतर होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.