काळ बदलत गेला तशा सभोवतालच्या गोष्टी जशा बदलल्या तशा सण-समारंभांच्या पद्धतीतही काळानुरूप बदल होत गेले. सण-समारंभातील चालत आलेल्या रूढी-परंपरेत बदल तर झालेच शिवाय या काळात परिधान केल्या जाणाऱ्या विशिष्ट पोशाखांमधील बदलही वैशिष्टय़पूर्ण ठरले आहेत. भारतीय संस्कृतीत तसेच पारंपरिक सण, समारंभात स्वच्छतेला मोठे महत्त्व आहे. या स्वच्छतेला सोवळ्याचा साज चढविण्याची परंपरा फार जुनी असली तरी काल-परवापर्यंत ठरावीक दिसणाऱ्या रंगसंगतीत आता पाश्चिमात्य साज चढू लागला आहे. धार्मिक विधींपासून ते लग्नापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपली स्वतंत्र छाप उमटवणारे अर्थात पुरुषांनी आणि तरुणांनी परिधान केलेले ‘सोवळे’ या बदलाची उत्तम साक्ष देताना दिसते.
सोवळ्याला धार्मिकदृष्टय़ा फार महत्त्व आहे. सोवळे ही खरी तर व्यापक संकल्पना आहे. सोवळे याचा अर्थ ‘स्वच्छता’ किंवा ‘नियमांचे पालन’ असा होतो. मंगलकार्यात पुरुषाने परिधान केलेल्या रंगीत वस्त्रालाही ‘सोवळे’च म्हटले जाते. नऊवारी साडी ही स्त्रियांसाठी एका प्रकारचे सोवळेच आहे. कारण पूर्वीच्या काळात किंबहुना अजूनही काही ठिकाणी नऊवारी परिधान करूनच स्त्रियांचा स्वयंपाक चालतो. नऊवारी परिधान करून स्वयंपाकघरात शिरलेल्या स्त्रीला कोणीही शिवायचे नाही या रूढीला स्वच्छतेच्या संदर्भाशी अनेकदा जोडले जाते. त्याचप्रमाणे सोवळे नेसलेल्या पुरुषाच्या देवपूजेमध्ये अन्य कोणत्या व्यक्तीने व्याधी आणू नये, असाही एक धार्मिक संदर्भ आहे. पूर्वीच्या काळात चालणारे कडक सोवळे आजमितीस फारसे कुठे पाहायला मिळत नाही.
सोवळे नेसलेल्या व्यक्तीने अंगावर उपवस्त्र म्हणून उपरणे किंवा शाल परिधान करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. सोवळे नेसल्यानंतर पायात चप्पल न घालता अनवाणी कित्येक लोक वावरतात. पूर्वीच्या काळात लाल आणि पिवळा अशा दोनच रंगात सोवळे उपलब्ध होत असे. लाल सोवळ्याला ‘कद’ असे म्हणतात तर पिवळ्या रंगाच्या सोवळ्याला ‘पितांबर’ असे म्हणतात. परंतु काळानुसार हे स्वरूप बदलत गेले आणि सोवळे लाल, नारिंगी, क्रीम, मरून, जांभळा, राणी, मजेंडा, जर्मन ब्ल्यू, स्कीन कलर, भगवा अशा विविध रंगांमध्ये मिळू लागले आहे.
पारंपरिक सोवळे नेसण्याचीही एक विशिष्ट पद्धत होती. स्त्रिया साडी नेसताना जशा निऱ्या करतात, तशाच प्रकारच्या निऱ्या पारंपरिक सोवळे नेसताना कराव्या लागतात. निऱ्या व्यवस्थित झाल्या नाहीत, तर सोवळे व्यवस्थित नेसले गेले नाही, असे समजले जाते. त्याचप्रमाणे दोन्ही पायांच्या मधून निऱ्या घातलेला भाग पाठीमागील बाजूस खोचला जातो. त्याला ‘कासोटा’ असे म्हटले जाते. या सर्व गोष्टी प्रत्येकाला जमतीलच असे नाही. पारंपरिक सोवळे नेसण्याचे तंत्र जमले नाही तर चांगलीच पंचाईत होते. त्यामुळे गेल्या काही काळापासून विशेषत: गणेशोत्सवादरम्यान सोप्या पद्धतीने नेसता यावे असे सोवळे बाजारात उपलब्ध होऊ लागले आहे. सोवळे सहज नेसता यावे आणि ते फॅशनेबलही असावे या हेतूने इंडो-वेस्टर्न अर्थात भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीची सांगड घालणाऱ्या अनोख्या सोवळ्यांचा जन्म झाला आहे. अशाप्रकारची इंडो-वेस्टर्न सोवळ्यांची चलती ठाण्यातील बाजारात पाहायला मिळते आहे.
जीन्स किंवा ट्राऊझर पॅन्टसारखी ही सोवळी असतात. पायातून वरती सरकवलं की झालं सोवळं नेसून. त्यामुळे अगदी कमी अवधीत आणि कुठलाही त्रास सहन न करता ही सोवळी परिधान करता येतात. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात या ‘इंडो-वेस्टर्न’ प्रकारच्या सोवळ्यांकडे बहुतांशी ग्राहकांचा कल दिसतो आहे. त्यामुळेच कॉटन सोवळे, बेळगाव सोवळे, हाफ सिल्क, प्युअर सिल्क अशा विविध प्रकारची सोवळी बाजारात आपली छाप उमटवताना दिसत आहेत.
कॉटन सिल्क, बेळगाव सिल्क आणि हाफ सिल्कमध्ये हाफ सिल्क आणि बेळगाव सिल्क सोवळ्यांना ग्राहकांची जास्त मागणी असल्याचे, ठाण्यातील नौपाडा परिसरातील समर्थ भांडारचे भरत पटेल यांनी सांगितले. सोवळ्यावरती शॉर्ट कुर्ता घालण्याचीही फॅशन असल्याचे ते आवर्जून सांगतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा