सकाळच्या वेळी धावणे, चालणे किंवा व्यायामशाळेत जाण्याचा विचार मनात येणे हीच सर्वात आनंदाची बाब आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत किमान दिवसातील काही मिनिटे स्वत:च्या शरीरस्वास्थ्यासाठी काढायलाच हवीत आणि थंडीच्या दिवसांत घाम कमी येत असल्यामुळे व्यायामाचा उत्साह द्विगुणित होतो. सकाळच्या वेळी प्रत्येकजण आपापल्या सवयीनुसार धावायला जातो, चालतो, योगासन करतो मग हे सर्व करताना कपडय़ांकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्या त्या व्यायामासाठी काही खास कपडे बाजारात उपलब्ध आहेत. व्यायामाच्या वेळी नेहमी हलके व सैल कपडे घालावेत. व्यायाम करताना घाम येऊ नये यासाठी अँटिस्वेट कापडापासून तयार केलेल्या टी-शर्ट्सचा वापर वाढला आहे. तर आकर्षक शूज आणि सॉक्सही जोडीला येऊ लागले आहेत. त्यामुळे ‘सिक्स पॅक अॅब्ज’ची क्रेझ असलेल्या तरुणाईच्या कपडय़ांची फॅशनही अधिक आकर्षक बनू लागली आहे.
मॉर्निग वॉकला जाताना महिला व मुली ट्रॅक पॅण्ट किंवा थ्री फोर्थ परिधान करतात. त्यावर एखादा टीशर्ट घालणेही त्या पसंत करतात. थंडीच्या दिवसात फुल स्लीव्हच्या टीशर्ट्सना अधिक मागणी आहे. या दिवसांत थ्री फोर्थपेक्षा फुल ट्रॅक पॅण्ट घालण्याकडे तरुणींचा कल आहे. शरीराने स्थूल असलेल्या महिलांसाठी खास लाँग टी-शर्ट बाजारात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्पोर्ट्स अंतर्वस्त्रेही बाजारात मिळतात. पुरुषांसाठी व्ही आकारच्या गळयाचे टी शर्ट आणि हाफ व फूल ट्रॅक पॅण्ट बाजारात उपलब्ध आहेत. धावायला जाताना केस डोळ्यांवर केस येऊ नयेत म्हणून तरुणी आकर्षक रंगाच्या रबर्सचा वापर करून उंच पोनीटेल बांधतात. लहान केस असणाऱ्यांसाठी बाजारात मिळणारे रंगीबेरंगी रबरबॅण्डने व्यक्तिमत्त्व अधिक खुलते.
पुरुषांसाठीही व्यायमासाठीचा ड्रेस कोड महत्त्वाचा ठरतो. शक्यतो शॉर्ट पॅण्ट, सॅण्डो बनियान किंवा टीशर्ट सर्वोत्तम. फूल ट्रॅक पॅण्ट असल्यास ती अगदी जमिनीवर लोळू नये याची काळजी घ्यावी. अन्यथा ती शूजमध्ये येऊन फाटण्याची शक्यता अधिक असते. मनगटावर बॅण्ड लावून कानाला वॉकमन किंवा आयपॉडवर गाणी ऐकता येतील. जॉगिंग करताना बरोबर जोडीदार असेल तर त्याच्याशी अधिक बोलणे टाळावे. यामुळे स्टॅमिनावर परिणाम होऊ शकतो. गार्डनमध्ये वगैरे वॉकिंगला जाणार असाल तर तिथे वॉर्मअपचे काही प्रकारही करता येऊ शकतील. शक्य असल्यास आणि गरज भासल्यास बरोबर पाण्याची बाटली ठेवल्यास अधिक उत्तम. पुरुषांसाठीही अंतर्वस्त्र (इनरवेअर) बरेच उपलब्ध आहेत. स्पोर्टस्वेअरच्या दुकानांमधून खास जॉगिंग किंवा वॉकिंगला जाण्यासाठीच्या अंतर्वस्त्रे उपलब्ध आहेत त्याचा आवर्जून वापर करावा.
महिलांसाठी..
राऊंड नेक टी-शर्ट
साधारणत: व्यायाम करताना किंवा चालताना सुटसुटीत कपडे परिधान करतात. त्यासाठी राऊंड नेक टी-शर्ट म्हणजे गोल गळ्याचे सुटसुटीत टी-शर्टचा सर्वाधिक वापर केला जातो. यामध्ये आकर्षक रंग आणि चित्रांची नक्षी असलेले टी-शर्ट बाजारात उपलब्ध आहेत. महिलांमध्ये अशा प्रकारच्या टी-शर्टस्ना सर्वाधिक पसंती दिली जात आहे.
टँक टॉप
सध्या तरुणींना या टँक टॉपची भुरळ पडली आहे. हे टॉप साधारण बनियनसारखे असतात. खास मुलींसाठी आकर्षक रंगामध्ये या टँक टॉपची निर्मिती केली आहे. त्यामध्ये गुलाबी, लाल, निळा अशा गडद रंगाची चलती आहे. हे टॉप सर्व प्रकारच्या पॅण्टवर उठून दिसतात. व्यायाम करताना शरीराच्या हालचालीनुसार ताणण्याची
क्षमता यामध्ये असल्यामुळे या टॉपचा सर्वाधिक वापर व्यायाम करताना वापरला जातो.
रिलॅक्स पॅण्ट
रिलॅक्स पॅण्टचा अर्थ म्हणजेच आरामदायी अशी पॅण्ट. हल्ली तरुणींमध्ये घट्ट कपडे घालण्याची फॅशन असली तरी, मॉर्निग वॉकच्या वेळी सुटसुटीत रिलॅक्स पॅण्ट घालणे सर्वच महिलावर्ग पसंत करतात.
केप्री पॅण्ट
केप्री पॅण्ट म्हणजे गुडघ्यापर्यंतची पॅण्ट. अशा प्रकारच्या पॅण्टमध्ये सर्वसाधारणपणे ताणणाऱ्या कापडाचा वापर केला जातो. यामध्ये सर्वाधिक करडय़ा रंगाला तरुणी पंसती देतात. कारण करडय़ा रंगावर कोणत्याही रंगाचे टी-शर्ट उठून दिसते.
टाइटस्
योगासन करताना साधारण घट्ट कपडे घालतात. त्यामध्ये ‘टाइट्स’ या पॅण्टचा प्रकार वापरला जातो.